सलग दोन पराभवांनंतरही इंग्लंडच्या बेन स्टोक्सला आशा

लंडन : सलग दोन सामन्यांत पराभूत झालो असलो तरी यंदा आम्हीच पहिल्यावहिल्या विश्वचषकाला गवसणी घालू, असा आशावाद अष्टपैलू बेन स्टोक्सने व्यक्त केला.

विश्वचषकापूर्वी जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इंग्लंडची दोन पराभवांमुळे दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून उपांत्य फेरीतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. मंगळवारी इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर त्यापूर्वी श्रीलंकेने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडवर सरशी साधली.

‘‘हा विश्वचषक आमचाच आहे. गेल्या चार वर्षांत चाहत्यांनी आम्हाला मोठय़ा प्रमाणावर प्रोत्साहन दिले आहे. खेळाडू म्हणून आम्हाला त्याची जाणीव असून चाहत्यांना आम्ही निराश करणार नाही. लागोपाठ दोन लढतीत आम्ही पराभूत झालो असलो, तरी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये आम्ही झोकात पुनरागमन करू.’’ असे स्टोक्स ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाला. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्टोक्सने अनुक्रमे ८२ आणि ८९ धावांची जिगरबाज खेळी साकारली.

फलंदाजांच्या चुकांमुळे पराभव -मॉर्गन

फलंजानांनी ठरवलेल्या योजनेनुसार खेळ न केल्यामुळे आम्हाला दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला, अशी खंत इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने व्यक्त केली. ‘‘गेल्या दोन्ही सामन्यांत आम्ही फलंदाजीच्या रणनीतीनुसार खेळ केला नाही. सकारात्मक दृष्टिकोन, भागीदारीचे  महत्त्व आणि स्वत:च्या नैसर्गिक शैलीप्रमाणे खेळ करण्यात आम्ही अपयशी ठरल्यामुळेच आम्ही पराभूत झालो,’’ असे मॉर्गन म्हणाला.

आता जबाबदारी आणखी वाढली -स्टार्क

इंग्लंडला नेस्तनाबूत करून विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली असली, तरी ऑस्ट्रेलिया संघाने बेसावध न होता आता अधिक जबाबदारीने खेळ करावा, अशी प्रतिक्रिया वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने व्यक्त केली. ‘‘उपांत्य फेरी गाठल्याचा आनंद आहेच. मात्र त्यापूर्वी आमच्यापुढे आणखी काही आव्हाने असून उर्वरित दोन सामन्यांत आम्ही बेसावध राहिल्यास धक्का मिळू शकतो. त्यामुळे सहकाऱ्यांना मी सावध राहण्याचा सल्ला देऊन अधिक जबाबदारीने खेळण्याचे सुचवेन,’’ असे विश्वचषकात आतापर्यंत १९ बळी मिळवलेल्या स्टार्कने सांगितले.

स्टार्क आणि मी नक्कीच एकत्र खेळू शकतो -बेहरेंडॉर्फ

एकाच संघात उजव्या हाताने गोलंदाजी करणारे तीन वेगवान गोलंदाज तुम्ही पाहिले असतीलच. तर मग ऑस्ट्रेलियाच्या संघात मी आणि स्टार्क अंतिम ११ खेळाडूंमध्ये का खेळू शकत नाही, असा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेंडॉर्फने उपस्थित केला.