21 August 2019

News Flash

बेन स्टोक्स म्हणतो ‘सुपर ओव्हर… नको रे बाबा’, कारण…

"आयुष्यात पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळायची नाहीये"

यजमान इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळवले. न्यूझीलंडने २४१ धावा करून इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक बाऊंड्री (चौकार-षटकार) मारण्याच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आला. पण सुपर ओव्हरमध्ये एक षटकार लगावणारा आणि सामनावीर ठरणारा बेन स्टोक्स याने पुन्हा कधीही सुपर ओव्हर खेळायची नाही अशी इच्छा व्यक्त केली आहे.

 

“मूळ सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे मी खूप कंटाळलो होतो. मला स्वतःचाच राग येत होता. मला अजिबात सुपर ओव्हर खेळण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा मी तंबूत परतलो तेव्हा मला मॉर्गनने सांगितले कि जोस बटलर सोबत मलाच फलंदाजीसाठी जायचे आहे. बटलरसोबत जेसन रॉयल पाठवावे असे मी सुचवले होते. पण एका बाजूची सीमारेषा छोटी असल्याने मॉर्गनला डावखुरा आणि उजवा असे दोन प्रकारचे फलंदाज मैदानात हवे होते. म्हणून मला सुपर ओव्हर खेळावी लागली. पण पुन्हा मला कधीही सुपर ओव्हरच्या थरारात समाविष्ट व्हायचे नाही, असे स्टोक्सने सांगितले.

दरम्यान, दरम्यान, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.

या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

First Published on July 18, 2019 3:34 pm

Web Title: cricket world cup 2019 ben stokes super over england new zealand eoin morgan vjb 91