इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ८९ धावांवर फलंदाजी करणाऱ्या बेन स्टोक्सचा ताशी १४५ किमी वेगाने यॉर्कर टाकून त्रिफळा उडवला. स्टार्कचा हा चेंडू खेळण्यासाठी स्टोक्सची बॅट खाली येण्यापूर्वीच यष्टय़ा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळे बुधवारी समाजमाध्यमांवर स्टार्कच्या त्या चेंडूविषयी फार चर्चा रंगली. काहींनी विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून त्याचे कौतुक केले. असे चेंडू तुम्हाला वारंवार पाहायला मिळत नाहीत, स्टार्कचे जसप्रीत बुमराला खुले आव्हान, ‘आयसीसी’ने स्टार्कचा यॉर्कर आणि उसेन बोल्टमध्ये सर्वात वेगवान कोण आहे, याची पडताळणी करावी, अशा प्रकारच्या गमतीदार प्रतिक्रिया ‘ट्विटर’वर उमटल्या. त्याशिवाय बाद झाल्यानंतर स्टोक्सने पाय मारून बॅट उडवल्यामुळे काहींनी त्याच्यावर टीकासुद्धा केली.