भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात, अफगाणी गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारतीय संघाच्या धावगतीवर अंकुश ठेवला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांचे इमले रचणारा भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध फारशी मजल मारु शकला नाही. राशिद खान, मुजीब उर रेहमान, राशिद खान, रेहमत शाह यांनी भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. विराट कोहलीने अर्धशतक झळकावत, भारताची बाजू सावरुन धरली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करताना आज भारतीय फलंदाजांना अनेक अडचणी येत होत्या. विराट कोहली माघारी परतल्यानंतर धोनी आणि केदार जाधवने संघाची बाजू सावरली. मात्र या दोघांनाही झटपट धावा करणं जमलं नाही. राशिद खानच्या गोलंदाजीवर धोनीने फटका खेळून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर केदार जाधव धाव घेण्यासाठी पुढे आल्यानंतर, मैदानात दोघांमध्ये उडालेला सावळा गोंधळ हा पाहण्यासारखा होता.

महत्वाची गोष्ट म्हणजे, केदार जाधवला बाद करण्याची ही सुवर्णसंधी अफगाणिस्तानने गमावली. राशिद खानने केलेला थ्रो पकडायला नॉन-स्ट्राईक एंडवर कोणताही क्षेत्ररक्षक हजर नव्हता. त्यामुळे केदार जाधवला जीवदान मिळालं. यानंतर केदारनेच हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरत अर्धशतक झळकावलं. या दोन्ही फलंदाजांनी भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : विराट कोहलीचं अर्धशतक, मोहम्मद अझरुद्दीनच्या विक्रमाशी बरोबरी