गौतमी देशपांडे

क्रिकेटसंदर्भातील सर्व घडामोडी जाणून घेण्याची मला आवड आहे. क्रिकेटचा प्रत्येक सामना मी अगदी आठवणीने पाहते. या विश्वचषकातदेखील चित्रीकरणातून वेळ काढून जसे जमेल तसे मी सामने पाहत आले आहे. भारत आणि पाकिस्तानचा यांच्यातील सामना ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेच्या सर्व चमूने एकत्र येऊन पाहिला. त्यासाठी खास सुट्टीचे प्रयोजन करण्यात आले होते. भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक पहिल्यांदा जिंकला, त्या वेळी आम्ही सर्व मित्रमैत्रिणींनी भारतीय संघाचे टी-शर्ट घालून जल्लोष केला होता. तेव्हा भारत जिंकणार नाही, अशीच चर्चा सगळीकडे होती. पण भारताने दमदार विजय नोंदवला आणि सर्वाच्याच उत्साहाला उधाण आले. त्या वेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहिलेला आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. भारतीय संघातला प्रत्येक खेळाडू माझ्या आवडीचा आहे, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत. प्रत्येकजण भारताला जिंकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. यंदाच्या विश्वचषकात भारत अंतिम सामन्यात जाणार आणि जिंकणार हे गृहित धरून आम्ही सुट्टीचे आणि कशा पद्धतीने सामन्याचा आनंद घेता येईल, याचे पूर्वनियोजन केले आहे. जणू भारताच्या विश्वविजयाची तयारीच आम्ही केली आहे.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)