21 August 2019

News Flash

भारत उपांत्य फेरीत दाखल, पाकिस्तानचं काय होणार??? वाचा काय आहेत निकष…

...तरच पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट

टीम इंडियाने बांगलादेशवर २८ धावांनी मात करत उपांत्य फेरीत आपलं स्थान पक्क केलं आहे. रोहित शर्माचं शतक आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहचा भेदक मारा या जोरावर भारताने बांगलादेशची झुंज मोडून काढली. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने एकाकी झुंज दिली, मात्र त्याचे प्रयत्न फोल ठरले. या पराभवामुळे बांगलादेशच्या संघाचं उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचं स्वप्न अखेर भंगलं आहे. मात्र बांगलादेशच्या या पराभवामुळे पाकिस्तानी संघासमोरच्या आशा अजुन कायम राहिल्या आहेत. मात्र उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानी संघाला मोठं दिव्य पार पाडावं लागणार आहे. पाकिस्तानचा संघ सध्या ९ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानच्या संघासमोरचे निकष काय असतील जाणून घेऊयात….

१) न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात, न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली तर पाकिस्तानचा रस्ता सुकर होईल. न्यूझीलंडचा संघ सध्या ११ गुणांनिशी तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात विजय मिळवल्यास १३ गुणांनिशी न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल होईल. असं झाल्यास पाकिस्तानला बांगलादेशवर मात करावी लागणार आहे, ही कामगिरी करुन दाखवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीत दाखल होऊ शकतं.

२) मात्र इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंग्लंडने बाजी मारली, तर १२ गुणांसह यजमान संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. असं घडल्यास न्यूझीलंडने हा सामना किमान २००-२५० धावांच्या फरकाने हरावा आणि इतक्याच मोठा फरकाने पाकिस्तानने बांगलादेशवर मात करावी अशी प्रार्थना पाकिस्तानचा संघ आणि चाहते करत असतील.

First Published on July 3, 2019 1:00 am

Web Title: cricket world cup 2019 criteria for pakistan to enter semi final psd 91