News Flash

Cricket World Cup 2019 : सानिया मिर्झाकडून पाकिस्तानी क्रिकेट संघाचं अभिनंदन

पाकिस्तानने इंग्लंडवर केली १४ धावांनी मात

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर टेनिसस्टार सानिया मिर्झा हीदेखील अनेकदा चर्चेचा विषय ठरली. तशातच आता सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वाचषकाचा सामना भारताने खेळू नये असा सूर उमटला होता. यावरून बराच वादंग निर्माण झाला होता. पण या दरम्यान, सानिया मिर्झाने पाकिस्तानच्या संघाला त्याच्या विश्वचषकातील पहिल्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलामीच्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. पाकिस्तानने यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेतील गुणांचे खाते उघडले. याबाबत सानियाने ट्विट करून पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले. “पक्षितांच्या संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. कोणालाही अंदाज नसताना तुम्ही ज्या पद्धतीचा विजय मिळवलात, त्यासाठी तुमचे अभिनंदन !!! आता क्रिकेट विश्वचषक अधिक रंजक झाला आहे”, असे ट्विट सानियाने केले आहे.

दरम्यान, इंग्लंडने ३४९ धावांचा पाठलाग करताना जेसन रॉयला (८) लवकर गमावले. त्यानंतर आलेल्या जो रूटने लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी-दुहेरी धावा काढण्यावर भर दिला. जॉनी बेअरस्टो ३२ धावांवर माघारी परतला. तर मॉर्गनही अवघ्या चार धावा करू शकला. त्यानंतर मात्र रूट आणि बटलर यांनी पाचव्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी रचली. बटलरने ७५ चेंडूंत कारकीर्दीतील नववे शतक झळकावले, तर रूटने १०७ धावांची खेळी करताना १० चौकार व एक षटकार लगावला. मात्र रूट व बटलर दोघेही माघारी परतल्यामुळे इंग्लंडचा संघ पिछाडीवर पडला. वहाबने ४८व्या षटकांत दोन बळी मिळवत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी, इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानने ३४८ धावांचा डोंगर उभारला. मोहम्मद हाफिज (८४), बाबर आझम (६३) आणि सर्फराज अहमद (५५) या तिघांनी ठोकलेल्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडला ५० षटकात ३४९ धावांचे आव्हान दिले. डावाच्या सुरूवातीला मोईन अलीने अप्रतिम गोलंदाजी करत पाकिस्तानच्या डावाला अंकुश लावला होता. मात्र शेवटच्या षटकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी फटकेबाजी करत ३४८ धावांची मजल मारली.

मो. हाफिज

इंग्लंडने नाणेफेक जिकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पाकिस्तानकडून खेळताना इमाम ऊल हक आणि फखर झमान यांनी अर्धशतकी सलामी दिली. त्यांनी ८२ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर झमान बाद झाला. त्याने ३६ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. मोईन अलीने त्याचा काटा काढला. यष्टीरक्षक बटलर याने त्याला चपळाईने यष्टिचीत केले. पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज इमाम उल हक याने दमदार फलंदाजी करत ५८ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ४४ धावा केल्या होत्या. फिरकीपटू मोईन अली याच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार खेचावा आणि दिमाखात अर्धशतक साजरे करावे विचाराने इमामने उंच फटका खेळला, हा फटका अंदाजापेक्षा कमी पडला. महत्वाचे म्हणजे हा चेंडू चौकार जाणे शक्य होते, पण वोक्सने धावत जाऊन हवेतच चेंडू झेलला. त्यामुळे इमामला ४४ धावांवर माघारी परतावे लागले.

त्यानंतर आलेल्या बाबर आझमने अर्धशतक झळकावले. त्याने ६६ चेंडूत ६३ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. पाठोपाठ मोहम्मद हाफिझनेही इतर फलंदाजांच्या साथीने चांगली खेळी करत पाकिस्तानला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. सर्फराज अहमदने ५५ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 11:33 am

Web Title: cricket world cup 2019 eng vs pak sania mirza congratulations tweet pakistan cricket team
Next Stories
1 आफ्रिकेविरुद्ध लढतीआधी जसप्रीत बुमराहची उत्तेजक द्रव्य चाचणी
2 कार्डिफवर आशियाई द्वंद्व!
3 दुखापतग्रस्त एन्गिडी भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार
Just Now!
X