गतविजेच्या ऑस्ट्रेलियावर मात करत यजमान इंग्लंडने २०१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं. तब्बल २७ वर्षांनी इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. याआधी १९९२ साली इंग्लंडने अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता.

ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयासह इंग्लंड या स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात यजमान देश स्पर्धेचं विजेतेपद मिळवू शकला नव्हता. मात्र २०११ साली भारताने ही मोठी परंपरा खंडीत करुन दाखवत विजेतेपद पटकावलं. त्यानंतर २०१५ साली ऑस्ट्रेलियानेही आपल्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला. हाच ट्रेंड कायम राहिल्यास इंग्लंड यजमान या नात्याने घरच्या मैदानावर आपलं पहिलं विजेतेपद पटकावून अनोखी हॅटट्रीक साधू शकतो.

सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. रविवारी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना रंगणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : इंग्लंडची ९ हजारहून अधिक दिवसांची प्रतिक्षा फळाला