लीड्स : जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांना आतापर्यंत साजेशा खेळ करणारा इंग्लंडचा संघ शुक्रवारी जेव्हा श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर चारशे धावांचा आकडा गाठण्याचेच ध्येय असेल. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात प्रथमच हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर होणाऱ्या सामन्यात धावांचा वर्षांव करून गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थान मिळवण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू उत्सुक असतील.

पाच सामन्यांतून चार विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या इंग्लंडने मंगळवारी ३९७ धावा फटकावून अफगाणिस्तानचा १५० धावांनी फडशा पाडला. कर्णधार ईऑन मॉर्गनने १७ षटकारांसह साकारलेले शतक, जॉनी बेअरस्टोचे अर्धशतक व मोइन अलीने अखेरच्या षटकांत केलेली उपयुक्त फटकेबाजी यामुळे इंग्लंडचे जवळपास सर्वच फलंदाज लयीत आले आहेत. त्यांना रोखण्यासाठी श्रीलंकेच्या गोलंदाजांना सर्वस्व पणाला लावावे लागेल.

दुसरीकडे श्रीलंकेला पाच सामन्यांतून फक्त एक विजय मिळाला असून सांघिक कामगिरी करण्यात त्यांना अपयश येत आहे. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने व कुशल परेरा वगळता श्रीलंकेच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध तरी ते जबाबदारीने फलंदाजी करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. गोलंदाजीत अनुभवी लसिथ मलिंगा आणि नुवान प्रदीप यांच्यावर श्रीलंकेची भिस्त आहे.

सामना क्र. २७

इंग्लंड वि. श्रीलंका

’स्थळ : हेडिंग्ले क्रिकेट ग्राऊंड, लीड्स   ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

रॉय आणखी दोन सामन्यांना मुकणार?

मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेणाऱ्या जेसन रॉयला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीलाही मुकावे लागणार आहे. त्याशिवाय गुरुवारी करण्यात आलेल्या तंदुरुस्ती चाचणीत रॉयची दुखापत बरी होण्यास आणखी वेळ लागणार असल्याने २५ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यालासुद्धा रॉय मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संघ

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जोस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल रशीद, मार्क वूड, लिआम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, जेम्स विन्स, लिआम डॉवसन, ख्रिस वोक्स, टॉम करन.

श्रीलंका : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) लसिथ मलिंगा, अविष्का फर्नाडो, लाहिरु थिरिमाने, कुसल परेरा, कुसल मेंडिस, अ‍ॅँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी’ सिल्व्हा, जेफ्री वॅँडरसे, थिसारा परेरा, इसुरू उडाना, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना.