इंग्लंडमध्ये रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडला स्पर्धेचे विजेतेपद मिळाले. दोनही संघांनी निर्धारित ५० षटकात समान धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघाच्या १५ धावा झाल्या. त्यामुळे अखेर सर्वाधिकवेळा चेंडू सीमारेषेपार पोहोचवणाऱ्या इंग्लंडच्या संघाला विश्वविजेतेपद देण्यात आले. या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली. पण त्या साऱ्यांमध्ये एक चाहता हा फारच कमनशिबी ठरला. ५० तासांचा प्रवास करूनही त्या चाहत्याला सुपर ओव्हरच्या थराराचा साक्षीदार होणे शक्य झाले नाही.

न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघाला पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी न्यूझीलंडचा मायकल जॉननिक नावाचा चाहता गुरुवारनंतर इंग्लंडला निघाला. त्याने अंतिम सामन्याला हजेरी लावण्यासाठी विमानाचे तिकीट काढले आणि प्रवासाला सुरुवात केली. न्यूझीलंडपासून लॉर्ड्स मैदानावर पोहोचण्याचा प्रवास खूप मोठा होता. तब्बल २५ तासांचा प्रवास करून मायकल शनिवारी इंग्लंडमध्ये पोहोचला. त्याने अंतिम सामना संपण्याच्या निर्धारित वेळेनंतरचे परतीचे तिकीट काढले होते. पण पावसाने त्यांना दगा दिला.

अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशिराने झुरू झाला. त्यातही मूळ सामना अनिर्णित राहिला. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांचा ५० – ५० षटकांचा खेळ मायकलने पूर्ण पाहिला. पण सुपर ओव्हरसाठी त्याला थांबता आले नाही. सुपर ओव्हर होणार आहे याची मायकलला कल्पना होती, पण त्याला हॉटेलमधून बॅग घेऊन वेळेत विमानतळावर पोहोचायचे होते. त्यामुळे दुर्दैवाने ‘सुपर ओव्हर’चा थरार अनुभवण्याची त्याची संधी हुकली.

याबाबत नंतर बोलताना मायकल म्हणाला की ‘ती’ सुपर ओव्हर पाहायला न मिळाल्याची सल मनात कायम राहील. सामन्याचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने लागला नाही पण मला प्रवासाचा अजिबात पश्चात्ताप झालेला नाही. इंग्लंडमधील वातावरण छान आणि प्रसन्न होते त्यामुळे माझे पैसे वसूल झाले असे तो म्हणाला.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण सलामीवीर हेन्री निकोल्स (५५) आणि टॉम लॅथम (४७) यांच्याव्यतिरिक्त कोणीही जबाबदारीने खेळ केला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडला विजयासमीप नेले.स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला.