विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या पराभवानंतर भारताच्या संघ निवडीवर टीकेला सुरुवात झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी, भारतीय संघाची निवड योग्य नसल्याचं म्हणत, एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीला धारेवर धरलं आहे.

“संघाची निवड करताना कसलाही विचार केला गेला नाही असं माझं मत आहे. अक्कल गहाण ठेऊन कोणतीही चर्चा न करता संघनिवड झाली असं वाटतंय. तुम्हाला प्रत्येक विभागाचा विचार करणं गरजेचं असतं. संघनिवड करताना तुमच्याकडे Plan B असणं गरजेचं आहे, आणि हा Plan B तुमच्या Plan A इतकाच मजबूत असणं गरजेचं असतं. तुमच्याकडे फलंदाज नाहीयेत का, ३ यष्टीरक्षकांना सोबत घेऊन खेळण्यात काय अर्थ आहे?? जर निवड समिती चांगले फलंदाज निवडू शकत नसेल तर भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक क्रिकेट स्पर्धांचा काय उपयोग आहे? देशभरात लाखो खेळाडू खेळत आहेत आणि वन-डे क्रिकेटमध्ये तुम्हाला चांगले ५ फलंदाज निवडता येत नसतील तर कठीण आहे.” इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत वेंगसरकर यांनी आपलं मत मांडलं.

भारतीय संघ या विश्वचषक स्पर्धेत आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांवर अवलंबून होता. त्यामुळे उपांत्य फेरीत पोहचेपर्यंत आपण मधल्या फळीतल्या फलंदाजांच्या अपयशाकडे दुर्लक्ष करत राहिलो. उपांत्य सामन्यात अवघ्या ५ धावांमध्ये ३ फलंदाज माघारी परतले, इकडेच आपण सामना गमावला होता. रविंद्र जाडेजाने आश्वासक खेळी केली, मात्र अशा परिस्थितीत त्याच्याकडून विजयाची अपेक्षा करणं योग्य ठरलं नसतं. साखळी सामन्यांमध्ये आपण जाडेजाला पुरेशी संधी दिली नाही. पहिल्या ४-५ फलंदाजांनी सामना जिंकवून द्यायला हवा होता. वेंगसरकर बोलत होते.

अवश्य वाचा  – अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर योग्य होता, निवड समितीने चुकीचा संघ निवडला !