भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्व चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अनेक सामने पावसामुळे वाया गेले. मात्र आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना आज खेळवला जाईल. आजही मँचेस्टरच्या मैदानावर पाऊस हजेरी लावणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आजच्या दिवसाच्या खेळात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे डकवर्थ लुईसचा आधार न घेता सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

मंगळवारी झालेल्या खेळादरम्यान ४६.१ षटकानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावली. यादरम्यान न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात २११ धावांपर्यंत मजल मारली होती. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला.

सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली.

विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. पावसामुळे खेळ थांबवला गेला तेव्हा टेलर नाबाद ६७ धावांवर खेळत होता. भारताच्या सर्व गोलंदाजांना १-१ बळी मिळाला.