आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने रविवारी लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यासाठी, पंच आणि सामनाधिकाऱ्यांची नावं जाहीर केली आहेत. न्यूझीलंडने भारतीय संघावर मात करुन तर यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात, इंग्लंडच्या जेसन रॉयला चुकीच्या पद्धतीने बाद ठरवणारे श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेनाच अंतिम सामन्यात पंच म्हणून काम पाहतील. याचसोबत दक्षिण आफ्रिकेचे मारियस इरॅस्मस हे धर्मसेना यांची साथ देतील.

ऑस्ट्रेलियाचे पंच रुड टकर हे अंतिम सामन्यात तिसरे पंच म्हणून काम पाहणार आहेत, तर राखीव पंच म्हणून पाकिस्तानचे आलिम दार हे मैदानात असतील. रंजन मदुगले अंतिम सामन्याचे सामनाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

अंतिम सामन्यात श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांच्या नावावर एक अनोखा विक्रम जमा होणार आहे. खेळाडू आणि पंच म्हणून विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारे ते पहिले व्यक्ती ठरतील. १९९६ साली कुमार धर्मसेना श्रीलंकेच्या विश्वचषक संघामध्ये होते. अंतिम फेरीत श्रीलंकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. ९६ साली धर्मसेना यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीवर स्टिव्ह वॉची विकेट घेतली होती.