इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत, बीसीसीआय विरुद्ध आयसीसी यांच्यात आगामी काळात नवीन वाद रंगणार अशी चिन्ह निर्माण झाली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी, लष्कराच्या पॅरा कमांडो दलाचं बलिदान चिन्ह आपल्या ग्लोव्ह्जवर लावून मैदानात उतरला होता. ICC ने यावर आक्षेप घेतल्यानंतर, भारतामध्ये याच्या तीव्र प्रतिक्रीया उमटल्या. बीसीसीआयने या प्रकरणी धोनीच्या पाठीमागे उभं राहत धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळण्याची परवागी मागितली.

मात्र  ICC ने BCCI ची ही मागणी फेटाळली आहे. धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याआधी आयसीसीकडे कोणत्याही प्रकारची परवानगी मागितली नव्हती. कोणत्याही प्रकारचं चिन्ह किंवा एखादा लोगो घेऊन मैदानात उतरणं हे आयसीसीच्या नियमांना धरुन नसल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये धोनीला लष्कराचं बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज घालून खेळता येणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

ICC ने धोनीच्या ग्लोव्ह्जला आक्षेप घेतल्यानंतर भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर आयसीसीविरोधात रोष व्यक्त केला होता. सोशल मीडियावर धोनीला पाठींबा देत सर्व प्रसारमाध्यमांनी आयसीसी आणि बीसीसीआयवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला. केंद्रीय क्रिडामंत्री किरेन रिजिजू यांनीही याप्रकरणात जनभावनेचा आदर व्हायला हवा असं वक्तव्य केलं होतं. मात्र आयसीसीने आपल्या नियमांवर ठाम राहत बीसीसीआयची विनंती फेटाळली आहे.