साऊदम्पटनच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर मात करत आपली विजयी घौडदौड कायम राखली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताने अफगाणिस्तानसमोर २२५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, रेहमत शाह यांनी आक्रमक फलंदाजी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकात टिच्चून मारा करत विजय खेचून आणला. मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात ३ बळी घेत हॅटट्रीकची नोंद केली.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीकची नोंद करणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. शमीने मोहम्मद नबी, अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला माघारी धाडत हॅटट्रीक आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात हॅटट्रीक घेणारा शमी नववा गोलंदाज ठरला.

याशिवाय तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. १९८७ साली भारताचे माजी गोलंदाज चेतन शर्मा यांनी अशी कामगिरी केली होती. शमीने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ९.५ षटकांत १ षटक निर्धाव टाकत ४० धावा देऊन ४ बळी घेतले.