भारताने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने भारतासाठी हा सामना महत्वाचा आहे. त्याच दृष्टीने या सामन्यामध्ये भारताने संघामध्ये दोन महत्वपूर्ण बदल केले आहेत. भारताने विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले असून ऋषभ पंतचाही सलग दुसऱ्या सामन्यासाठी संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळावायचे याचे कोडे अद्याप भारतीय संघाला सुटले नाही. त्यातच या दोघांनाही एकाच वेळी संधी देण्यात आल्याने चौथ्या क्रमांकावरील प्रयोग अद्याप सुरु असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. मात्र या दोघांना एकाच वेळी संधी देण्यात आल्याने आज भारतीय संघातील चार यष्टीरक्षक मैदानात खेळताना दिसतील. कार्तिक आणि पंतबरोबरच एम. एस धोनी, के. एल राहुलही संघात असल्याने यष्टीरक्षकांची चौकडी मैदानात दिसेल.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये संघात स्थान मिळालेल्या केदार जाधव आणि कुलदीप यादवला बंगालादेशविरुद्धच्या सामन्यासाठी वगळण्यात आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संथ गतीने फलंदाजी करणाऱ्या केदारवर सर्वच स्तरातून टिका झाली होती. तर दुसरीकडे संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली असली तरी इंग्लंडविरुद्ध गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी न करु शकलेल्या कुलदीप यादवलाही या सामन्यासाठी संघाच्या बाहेर बसावे लागणार आहे.
पर्याय शोधण्याचा प्रयत्न…
विश्वचषकानंतर महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच धोनीच्या निवृत्तीनंतर त्याचा वारसदार कोण याचा भारतीय संघ व्यवस्थापन शोध घेत आहे. या स्पर्धेमध्ये एक दोन सामने वगळता धोनीने केलेली संथ फलंदाजी पाहता भारतीय संघाला लवकरात लवकर धोनीला पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे मत आहे. धोनी जरी विश्वचषक खेळणार असला तरी त्याच्या देखरेखीखाली त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू शोधण्याचे आव्हान भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. म्हणूनच या स्पर्धेमध्ये सलामीला येणारा के. एल. राहुल असो किंवा इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरणार पंत असो किंवा आज पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणारा कार्तिक असो, भारतीय संघ व्यवस्थापन सर्व शक्यता पडताळून पाहताना दिसत आहे. म्हणूनच आज पहिल्यांदाच एकाच वेळेस चार यष्टीरक्षक मैदानात खेळताना पाहण्याचा अनोखा योग जुळून आला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघ:
के. एल. राहुल
रोहित शर्मा
विराट कोहली (कर्णधार)
ऋषभ पंत
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
दिनेश कार्तिक
हार्दिक पांड्या
युझवेन्द्र चहल
मोहम्मद शामी
भुवनेश्वर कुमार
जसप्रित बुमराह
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 2, 2019 3:31 pm