सलग चौथ्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक

साऊदम्पटन : बलाढय़ संघांना पराभवाचा धक्का देण्याची क्षमता असलेल्या अफगाणिस्तानच्या सुमार कामगिरीची सध्या चर्चा आहे. गेल्या पाच सामन्यांत पाच पराभव पत्करणाऱ्या अफगाणिस्तानला अद्यापही विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने खचलेल्या अफगाणिस्तानचा सामना करण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे.

साऊदम्पटनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान हे आशियाई संघ विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांशी भिडणार आहेत. चार सामन्यांत तीन विजय मिळवून मनोधैर्य उंचावलेल्या भारताशी भिडताना हा सामना एकतर्फी होण्याची चिन्हे आहेत. डाव्या हाताच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवनने विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याचबरोबर मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार किमान तीन सामन्यांत खेळू शकणार नाही. जसप्रित बुमराचा चेंडू थेट पायावर आदळल्यामुळे अष्टपैलू खेळाडू विजय शंकर जायबंदी झाला आहे. दुखापतींच्या या समस्यांवर तोडगा काढताना भारतासमोर सोपा पेपर असला तरी पुढील आव्हाने लक्षात घेता, भारताला आताच संघबांधणी करावी लागणार आहे. विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या बलाढय़ संघांना पराभूत करत उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे, तर न्यूझीलंडविरुद्धचा भारताचा सामना पावसामुळे रद्द झाला होता.

दुखापतींची चिंता नाही

* भारताने तिन्ही विजय सहजपणे मिळवले असल्यामुळे धवन, भुवनेश्वर आणि शंकरच्या दुखापतीचा कामगिरीवर कोणताही परिणाम पडणार नाही.

* ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणाऱ्या धवनला गमावणे, हा भारतासाठी मोठा धक्का असला तरी लोकेश राहुलने संयमी अर्धशतकी खेळी करत धवनची जागा काही प्रमाणात भरून काढली आहे.

* रोहित शर्मा सध्या चांगल्या बहरात असल्यामुळे सुमार कामगिरी करणाऱ्या रशिद खानसारख्या फिरकीपटूसमोर रोहितकडून चौथ्या द्विशतकाची अपेक्षा केली जात आहे. कर्णधार विराट कोहलीनेही दोन अर्धशतके फटकावत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

केदारला वरच्या क्रमांकावर संधी?

भारताच्या फलंदाजीची जबाबदारी आतापर्यंत रोहित, धवन आणि कोहली यांनी सांभाळली असली तरी या सामन्यात मधल्या फळीतील केदार जाधवला वरच्या क्रमांकावर संधी मिळू शकते. तीन सामन्यांत केदारने फक्त आठ चेंडूंचा सामना केला आहे. मधल्या फळीकडून चांगल्या योगदानाची अपेक्षा ठेवण्यासाठी केदारला फलंदाजीचा सराव मिळणे आवश्यक आहे. हार्दिक पंडय़ा आणि महेंद्रसिंह धोनी आपली कामगिरी चोखपणे निभावत आहेत. त्याचबरोबर भुवनेश्वरच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीला यंदाच्या विश्वचषकातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळेल.

पंतचे विश्वचषकात पदार्पण?

शंकरच्या दुखापतीची भारताला काहीशी चिंता असली तरी यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत त्याची उणीव सहज भरून काढू शकतो.

शंकर वेळेत तंदुरुस्त झाला नाही तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी ऋषभ पंतला विश्वचषकात पदार्पणाची संधी मिळू शकेल.

संघ व्यवस्थापनाने अनुभवी खेळाडूला संधी देण्याचे ठरवले, तर दिनेश कार्तिकची वर्णी लागू शकते. मात्र इंग्लंडमधील खेळपट्टय़ांवर चांगली कामगिरी करणारा पंत कार्तिकपेक्षा वरचढ ठरू शकतो.

रशिद खान अपयशी

अफगाणिस्तानची फलंदाजी पुरती निष्प्रभ ठरली असली तरी इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टय़ांवर अव्वल फिरकीपटू रशिद खानचे अपयश त्यांना चांगलेच भोवते आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रशिदने नऊ षटकांत ११० धावा बहाल केल्या. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात रशिदने जोमाने पुनरागमन करावे, अशी अपेक्षा अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदीन नैब करीत आहे. गेल्या सामन्यात प्रत्येकी तीन बळी मिळवणारे गुलाबदीन आणि दौलत झादरान हे त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहेत. मुजीब उर रहमान आणि मोहम्मद नबी यांना भारतीय खेळाडूंविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. मात्र भारताच्या दमदार फलंदाजीसमोर त्यांची गोलंदाजी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलिया असो वा अफगाणिस्तान, कोणत्याही संघाला आम्ही कमी लेखणार नाहीत. आमच्या क्षमतेवर आमचा पूर्ण विश्वास असून त्यानुसारच आम्ही खेळ करणार आहोत.

– जसप्रीत बुमरा,भारताचा वेगवान गोलंदाज

सामना क्र. २८

भारत वि. अफगाणिस्तान

* स्थळ : द रोज बाऊल, साऊदम्पटन  ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

अफगाणिस्तान : गुलाबदीन नैब (कर्णधार), मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), नूर अली झादरान, हझरतुल्ला झाझाई, रहमत शाह, असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्ला झादरान, समीउल्ला शिनवारी, मोहम्मद नबी, रशीद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हमीद हसन, मुजीब उर रहमान.

आमनेसामने एकदिवसीय

सामने : २, भारत : १, अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द : १

विश्वचषकात   

सामने : ०,  भारत : ०, अफगाणिस्तान : ०, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

साऊदम्पटनमध्ये शनिवारी पावसाची सूतराम शक्यता नाही. इंग्लंडमधील समतोल खेळपट्टय़ांमध्ये रोज बाऊल स्टेडियमची गणना होत असून येथे फलंदाज आणि गोलंदाजांना समान संधी असेल. मात्र या स्टेडियमवर झालेल्या दोन्ही सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.