गौरव जोशी

क्रिकेटपटू जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा त्यांचे कुटुंबीय हा सामना एक वेगळ्याच नजरेतून पाहत असतात. काही टीव्हीवर आणि काही स्टेडियमवर जाऊन, तर काही नातलग सामना अजिबात पाहत नाहीत. अफगाणिस्तान आणि इंग्लडचा सामना चालू होता, तेव्हा यॉर्कशायर क्रिकेट क्लबला एक वेगळच वातावरण होते.

डोरे या गावात यॉर्कशायर कौंटी क्लब आहे. जो रूट हा इंग्लंडचा खेळाडू डोरे गावातलाच. जेव्हा जो फलंदाजी करत होता, तेव्हा याच क्रिकेट क्लबमध्ये एका टीव्ही स्क्रीनसमोर एक वयस्कर गृहस्थ सामना बघत होते. जो रूटने एक षटकार मारल्यानंतर ते गृहस्थ दुसऱ्या गृहस्थाला म्हणाले, ‘‘डॉन, हा शॉट तू त्याला नक्कीच शिकवला नसशील!’’ डॉन फक्त हसले आणि पुन्हा सामना पाहायला लागले.

डॉन म्हणजे जो रूटचे आजोबा. डॉन आता ८४ वर्षांचे आहेत. पण जेव्हा त्यांना विचार जाते की, ‘‘तुम्ही सेवानिवृत्तीनंतर आपल्या आयुष्यातील आनंद कशा प्रकारे उपभोगता?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी माझ्या नातवंडाला क्रिकेट खेळताना पाहात गेली २०-२५ वर्षे जगलो आहे.’’

अजूनही जो रूट डोरेमध्येच राहतो आणि गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ डॉन हेसुद्धा इथेच राहात आहेत. जो रूट त्यांच्या घरापासून एका मैलाच्या अंतरावर राहतो. क्रिकेट खेळण्यासाठी वेगवेगळ्या शहरात त्याला नेणे, प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या अकादमीत नेणे, हे कार्य डॉन इमानेइतबारे करायचे. डॉन सांगत होते, ‘‘बऱ्याच वेळा जो रूट सामन्यात चांगल्या धावा करायचा. परंतु जेव्हा तो कमी धावा करायचा, तेव्हा मी त्याबाबत विचारायला गेल्यावर जो रूट केवळ त्याच्या कानावर हेडफोन लावून माझ्या चेहऱ्याकडे बघत बोलायचा. आज आजोबा मला प्रश्न नका हां विचारू!’’

जो रूटचे वडीलदेखील चांगले क्रिकेटपटू होते. डॉनचे वडील म्हणजेच जो रूटचे पंजोबा हेदेखील दुसऱ्या महायुद्धाच्या आधी उच्च दर्जाचे क्रिकेट खेळले आहेत. जो रूटच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, ‘‘बालपणी रूटची फलंदाजी बघण्यात एक वेगळीच मजा होती. त्या वेळी लोक बोलायचे की हा ११-१२ वर्षांचा असतानाच इंग्लडच्या संघामध्ये सहभागी होईल. पण मी कधीच अशी अपेक्षा ठेवली नव्हती. एक-एक पाऊल टाकत तो पुढे जाते आहे, यातच मला आनंद मिळत होता. १६ वर्षांखालील वयोगटात खेळताना रूटला यॉर्कशायरची शिष्यवृत्ती मिळाली होती. जोस बटलर, जॉनी बेअरस्टो हे खेळाडूसुद्धा त्यावेळी रूटसोबत होते.’’

आता चालू असलेले विश्वचषकातील सामने डॉन मात्र यॉर्कशायर क्रिकेट क्लबला जाऊन व्यवस्थितपणे पाहतात. डॉन वयाच्या तुलनेत अत्यंत तंदुरुस्त आहेत. त्याची बौद्धिकक्षमता ही अप्रतिम आहे. ते विराट कोहली, केन विल्यम्सन अशा अनेक चांगल्या फलंदाजांबद्दल भरभरून बोलतात. परंतु जो रूट विषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मी एक असा वयस्कर माणूस आहे, ज्याने डॉन ब्रॅडमनलाही खेळताना पाहिले आहे.’’

१९४८च्या अ‍ॅशेस दौऱ्यात १३ वर्षांच्या डॉन यांनी खऱ्या डॉन ब्रॅडमन यांना पाहिले होते. आता मात्र क्रिकेट पाहण्यातच त्यांना खरा आनंद मिळतो. केवळ टीव्हीवरच नाही तर ते इंग्लड संघासोबत ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका हे देशदेखील फिरले आहे. डिसेंबरमध्ये इंग्लड संघ दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. तेव्हासुद्धा ते त्यांच्यासोबत असणार आहेत. सामन्याचे तिकीट तर मिळतीलच, परंतु सामना झाल्यावर जो रूटसोबत एकत्र भोजनसुद्धा घेणार आहेत.

१२ वर्षांच्या जो रूटने शतक केल्यानंतर मी त्याला क्रिकेटचे धडे कधी दिले नाही. आता तर टीव्हीवर सगळीकडेच क्रिकेट दिसते. त्यामुळे माझे निवृत्तीचे दिवस अगदी छान चालले आहेत. जो रूटचे लहानपणीचे किस्से सांगताना डॉन म्हणाले, ‘‘जो रूट अतिशय शांत मुलगा आहे. डोरे या शहरात त्याचे खूप मित्र आहेत. क्रिकेट सोडले तर तो खूप चांगला संगीतकारदेखील आहे.’’