संपूर्ण देशभरात सध्या क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर चढलेला आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाजी मारत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मराठमोळ्या केदार जाधवने मात्र अशा परिस्थितीतही आपलं सामाजिक भान राखलं आहे.

इंग्लंडमध्ये सध्या पावसाचं वातावरण आहे. बहुतांश सामन्यांवर पावसाचं सावट आहे, सर्वांचं लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी, नॉटिंगहॅम शहरात आकाशात गर्दी केलेल्या ढगांकडे पाहून, वरुणराजाला एक सुंदर प्रार्थना केली आहे. माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे, असं म्हणत केदारने जा रे जा रे पावसा अशी वरुणराजाला विनवणी केली आहे. केदारचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये केदार जाधवला फलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही. गोलंदाजीमध्ये केदार आपली छाप पाडू शकला नाही. गुरुवारी भारत न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळेल, यानंतर रविवारी भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यांमध्ये केदार जाधवला आपलं खेळ दाखवण्याची संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.