२०१९ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघााचं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेचा गोलंदाज कगिसो रबाडाने धडाकेबाज सुरुवात केली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने घेतला. पहिलं षटक टाकणाऱ्या कगिसो रबाडाने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणरत्नेला माघारी पाठवलं. यादरम्यान करुणरत्नेच्या नावावर नकोशा विक्रमांची नोंद झाली आहे.

रबाडाचा चेंडू करुणरत्नेच्या बॅटची कड घेऊन, स्लिपमध्ये डु प्लेसिसच्या हातात जाउन सामावला. यासोबत  विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. यासोबत गोल्डन डक नावावर करणारा करुणरत्ने पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही.  आफ्रिकेविरुद्ध सामन्यात श्रीलंकेचा संघ विजयी ठरल्यास या स्पर्धेत त्यांचं आव्हान कायम राहणार आहे.