सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलचे स्पष्टीकरण

लंडन : देशासाठी सातत्यपूर्ण कामगिरीचे योगदान देण्याकरिता इंग्लंडमधील वेगळ्या वातावरणाशी त्वरित समरस होणे महत्त्वाचे असते, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने व्यक्त केले आहे.

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात राहुलने ९२ चेंडूंत ७७ धावा केल्या आणि रोहित शर्मासोबत १८० धावांची दमदार सलामीची भागीदारी नोंदवली. याच भक्कम सलामीच्या बळावर भारताने ९ बाद ३१४ अशी धावसंख्या उभारली. मग भारताने बांगलादेशचा डाव ४८ षटकांत २८६ धावांत गुंडाळून २८ धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

‘‘सातत्याने धावा करायच्या असतील, तर खेळपट्टीला साजेसे बदल स्वत:मध्ये करणे, हे मी गेल्या काही वर्षांत शिकलो आहे,’’ असे राहुलने सांगितले. अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे सलामीवीर शिखर धवनला विश्वचषकामधून माघार घ्यावी लागली आणि राहुलला चौथ्या स्थानावरून सलामीच्या स्थानावर पाठवण्यात आले.

‘‘साऊदम्पटन, मँचेस्टर आणि बर्मिगहॅम येथे झालेल्या गेल्या काही सामन्यांसाठीची खेळपट्टी ही धिमी होती. त्यामुळेच खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी सुरुवातीला थोडा वेळ घेतला आणि स्थिरावल्यावर फटकेबाजी केली. प्रत्येक खेळीतून मी शिकत असतो आणि त्यानुसार स्वत:ची फलंदाजी अधिक समृद्ध करीत असतो,’’ असे राहुलने सांगितले.

बांगलादेशविरुद्ध रोहितने साकारलेल्या शतकी खेळबाबत राहुल म्हणाला, ‘‘खेळपट्टी ही फारशी चांगली नव्हती. फक्त रोहितच अशा खेळपट्टीवर आत्मविश्वासाने फलंदाजी करू शकला. विश्वचषकात तो लयीत फलंदाजी करीत आहे. त्याच्या खात्यावर चार शतकेसुद्धा आहेत.’’