न्यूझीलंडला धूळ चारल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या सर्फराजचे मत

बर्मिगहॅम : दडपणाखाली आमच्या संघातील खेळाडू अधिक जबाबदारीने खेळतात. त्यामुळेच सामन्याचा निकालसुद्धा आमच्या बाजूने फिरतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने व्यक्त केली.

सलग दोन सामन्यांत विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा अद्यापही कायम आहेत. बुधवारी पाकिस्तानने आतापर्यंत विश्वचषकात अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला सहा गडी राखून पराभूत केले. ‘‘संघातील प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर मी समाधानी आहे. ज्यावेळी आमच्यावर दडपण येते त्यावेळी आम्ही नेहमीच चांगला खेळ करतो. बाबर आझमने साकारलेले शतक मी पाहिलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होते. त्याशिवाय गोलंदाजांनीही मोक्याच्या क्षणी बळी मिळवले,’’ असे सर्फराज म्हणाला.

‘‘उर्वरित दोन सामने बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तुलनेने दोन कमकुवत संघाविरुद्ध असले तरी आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी आम्ही विश्वचषकाची उपांत्य फेरी नक्कीच गाठू,’’ असेही सर्फराजने सांगितले.

सर्फराजच्या पत्नीला अश्रू अनावर

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदची डुक्कराशी तुलना करून त्याच्याविरुद्ध अर्वाच्य भाषा वापरल्यामुळे सर्फराजची पत्नी खुशबख्तला अश्रू आवरणे कठीण गेले. खुद्द सर्फराजने याविषयी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये मुलासोबत फिरत असताना एका चाहत्याने सर्फराजला ‘जाडे डुक्कर’ असे संबोधून त्याला शिवीगाळ केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पसरली होती. ‘‘हॉटेलमध्ये माघारी परतल्यावर ती चित्रफीत पाहून माझी पत्नी रडत असल्याचे मी पाहिले. पाकिस्तानचे चाहते फारच भावुक असल्याने मी तिला त्या चित्रफितीकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले,’’ असे सर्फराजने सांगितले. दरम्यान चित्रफितीत सर्फराजविषयी वाईट बोलणाऱ्या त्या चाहत्याने नंतर त्याची माफी मागितली.

पाकिस्तानात आनंदोत्सव

न्यूझीलंडला नमवून विश्वचषकातील आव्हान शाबूत राखल्यामुळे बुधवारी रात्री पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील सामन्यांतही अशाच प्रकारे खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याशिवाय बादशा रोडवर सर्फराज, बाबर यांचे भलेमोठे फलक घेऊन ट्रकवर मिरवणुका काढण्यात आल्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण पाकिस्तान न्हाऊन निघाले.