बांगलादेशविरुद्धचा सामना मोठय़ा फरकाने जिंकण्याची गरज

लंडन : १९९२च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे जवळपास बंद झाल्यातच जमा आहेत. मात्र गणितीय रचनेनुसार त्यांना अंधुकशा आशा दिसत आहेत. आता उपांत्य फेरीत मजल मारण्यासाठी शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानला अशक्यप्राय असा विजय मिळवावा लागणार आहे.

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड व अफगाणिस्तानला हरवत दिमाखात पुनरागमन केले. बाबर आझम आणि हॅरिस सोहेल यांनी फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्ध पाच बळी मिळवत मोहम्मद आमीरला उत्तम साथ दिली होती.

आठ सामन्यांतील चार पराभवांमुळे बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र बांगलादेशने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांविरुद्ध विजय मिळवत जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केले होते. आता बांगलादेशला आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

बांगलादेशची मदार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर अवलंबून आहे. शाकिबच्या फलंदाजीमुळे बांगलादेशने अनेक सामन्यांत ३००पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठला, पण गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रेहमानची विविधता आणि मोहम्मद सैफुद्दीनच्या अर्धशतकामुळे बांगलादेशने भारतालाही विजयासाठी झुंजवले होते. त्यामुळे पाकिस्तानला बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध विजय मिळवणे नक्कीच सोपे नसेल.

सामना क्र. ४३

पाकिस्तान वि. बांगलादेश

* स्थळ : लॉर्ड्स स्टेडियम, लंडन

* सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १,

स्टार स्पोर्ट्स २,  स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

आमनेसामने

एकदिवसीय :

सामने : ३६, पाकिस्तान : ३१, बांगलादेश : ५, टाय / रद्द : ०

विश्वचषकात :

सामने : १, पाकिस्तान : ०, बांगलादेश : १, टाय / रद्द : ०

संघ

पाकिस्तान : सर्फराझ अहमद (कर्णधार व यष्टीरक्षक), इमाम-उल-हक, फखर झमान, बाबर आझम, मोहम्मद हफीझ, शोएब मलिक, इमाद वसिम, शादाब खान, शाहिन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हसनैन.

बांगलादेश : मश्रफी मोर्तझा (कर्णधार ), तमिम इक्वाल, सौम्य सरकार, लिटन दास, मुशफिकर रहीम, महम्मदुल्ला, शाकिब अल हसन, महम्मद मिथुन, साबीर रहमान, मुसद्दीक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, रुबेल हसन, मस्तफिझूर रहमान, अबू झायेद.

उपांत्य फेरीचे समीकरण

इंग्लंडने अखेरच्या दोन सामन्यांत भारत आणि न्यूझीलंडला हरवत आपले उपांत्य फेरीचे स्थान निश्चित केले. त्यामुळे पाकिस्तानच्या उरल्यासुरल्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. चौथ्या क्रमांकावरील न्यूझीलंडचे नऊ सामन्यांत ११ गुण झाले आहेत. पाकिस्तान नऊ गुणांनीशी पाचव्या क्रमांकावर असून सरासरीमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला मोठय़ा फरकासह विजय मिळवावा लागणार आहे. मात्र त्यासाठी सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला आता गणितीय रचनेनुसार प्रथम नाणेफेक जिंकावी लागेल आणि फलंदाजी स्वीकारावी लागेल.

प्रथम फलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक धावा फटकावल्यास, पाकिस्तानला बांगलादेशवर ३११ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा ४००पेक्षा अधिक धावा उभारल्यास, त्यांना ३१६ धावांनी विजयाची नोंद करावी लागेल. मात्र बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यास, पाकिस्तानचे आव्हान लगेच संपुष्टात येईल.