वेस्ट इंडिजवर मात करत भारताने विश्वचषक स्पर्धेतल्या आपल्या पाचव्या विजयाची नोंद केली. फलंदाजीमध्ये कर्णधार विराट कोहली, गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. फलंदाजीमध्ये विराट, धोनी आणि राहुलचा अपवाद वगळता इतर फलंदाज फारशी चांगली कामगिरी करु शकले नाही. अष्टपैलू हार्दिक पांड्याने गोलंदाजीदरम्यान सुनील अँब्रिसचा बळी घेत विंडीजची महत्वाची जोडी फोडली. हार्दिक आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजी या अष्टपैलू गुणांमुळे भारतीय संघात आपली जागा राखून आहे.

विंडीजविरुद्धच्या सामन्यात हार्दिकची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रझाक फारसा खुश नाहीये. रझाकच्या मते हार्दिकच्या तंत्रामध्ये अनेक त्रुटी आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन रझाकने मत मांडलं.

याचवेळी बोलताना रझाकने हार्दिकमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनण्याचे पूर्ण गुण आहेत. बीसीसीआयने मला संधी दिल्यास मी त्याला प्रशिक्षण देऊ शकतो. अशी मागणीही केली.

अब्दुल रझाक हा तत्कालीन पाकिस्तानी क्रिकेट संघातला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जायचा. त्यामुळे बीसीसीआय आता अब्दुल रझाकच्या मागणीला काय उत्तर देते हे पहावं लागणार आहे.