News Flash

cricket world cup 2019 : अर्ध्यावरती डाव मोडला..

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन स्टेनला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

दीपाली पोटे-आगवणे

चार वर्षांतून एकदा होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचे असते. परंतु विश्वचषकात निवड होऊनही दुखापत झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव विश्वचषकस्पर्धा अर्ध्यावर सोडण्याची वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. विश्वचषकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत ३०पेक्षाही अधिक खेळाडूंचे अशाप्रकारे स्वप्न भंगले आहे. १९७५ ते १९८७ पर्यंतच्या विश्वचषकांमध्ये सामन्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे दुखापतींचे प्रमाणसुद्धा कमी होते. परंतु १९९२पासून विश्वचषकातील संघ आणि सामन्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दुखापतींचे आव्हानसुद्धा वाढले.

सध्याच्या विश्वचषकात डाव्या हाताच्या अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला संघात घेण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेन स्टेनला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याची जागा ब्युरन हेंड्रिक्सने घेतली. अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद शेहझादला गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले. परंतु आपल्याविरोधात कट-कारस्थान रचल्याचा दावा तो करीत आहे. त्याच्या जागी इकराम अली खिलला संघात स्थान मिळाले आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागल्यामुळे सुनील अ‍ॅम्ब्रिजची निवड करण्यात आली आहे.

१९७५मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सला झालेल्या दुखापतीमुळे रोहन कन्हायला संधी मिळाली. १९९६च्या विश्वचषकात इंग्लंडच्या डेरमॉट रीव्हने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. २००३च्या विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूच्या बदलासंदर्भात कडक नियम केले. त्यामुळे निवड झालेल्या १५ खेळाडूंव्यतिरिक्त अन्य खेळाडूला संघात सहभागी होता येणार नव्हते. याचप्रमाणे एकदा विश्वचषकातून माघार घेतल्यास पुन्हा संघात परतता न येण्याचा निर्णयसुद्धा अस्तित्वात आला.

२००३च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नला उत्तेजकांचे सेवन केल्याप्रकरणी एक वर्षांची बंदी घातल्याने त्याच्याऐवजी नॅथन हॉरित्झला संघात घेण्यात आले. जेसन गिलेस्पीला टाचेची दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसरा धक्का बसला. त्याच्या जागी नॅथन बॅ्रकनला घेण्यात आले. त्याच विश्वचषकात झिम्बाब्वेच्या मार्क व्हर्मेऊलेवला सामन्यादरम्यान डाव्या डोळ्याच्या वर चेंडू लागल्यामुळे पुढील सामने खेळता येणार नसल्याने स्पष्ट झाले. त्यामुळे अ‍ॅलिस्टर कॅम्पबेलला संघात स्थान मिळाले. याच संघातील ब्रायन मर्फीच्या पोटरीतील स्नायू दुखावल्यामुळे संघाबाहेर पडावे लागले. त्याची जागा स्टुअर्ट मॅटसिकेनीयेरीने घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भरवशाचा क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्सला फलंदाजी करताना उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे ग्रॅमी स्मिथला संघात घेण्यात आले. २००७च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघातील डॅरेल टफी आणि लू विन्सेंट यांना दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्यांच्या जागी ख्रिस मार्टिन आणि हमिश मार्शल यांना संधी मिळाली.

२०११मध्ये ऑस्ट्रेलिया संघातील डग बोलिंगरला गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक अर्धवट सोडावा लागला. त्याच्या जागी मायकेल हसीचा समावेश करण्यात आला. इंग्लंड संघातील चार खेळाडूंना वेगवेगळ्या कारणांमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली होती. जॉन लेविसला पत्नीच्या गरोदरपणातील समस्यांमुळे मायदेशी परतावे लागले. त्याच्या जागी स्टुअर्ट ब्रॉडची संघात निवड करण्यात आली. परंतु ब्रॉडला बरगडय़ांना दुखापतीमुळे या संधीचा फायदा घेता आला नाही आणि विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्याऐवजी ख्रिस ट्रेम्लेटला संघात स्थान मिळाले. केव्हिन पीटरसनला आजारपणामुळे संघाबाहेर पडावे लागले होते. त्यानंतर ईऑन मॉर्गनला संघात स्थान मिळाले. मग अजमल शहजादला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि मायकेल यार्डीला मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी जेड डर्नबॅश आणि आदिल रशीद यांना संधी मिळाली.

२०१५मध्ये झालेल्या विश्वचषकात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मिरवाइस अश्रफला मणक्याच्या दुखापतीमुळे स्पर्धा सोडावी लागली. त्याच्या जागी शफीकउल्लाची निवड करण्यात आली. संघाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बांगलादेश संघातील खेळाडू अल अमिन हुसेनला मायदेशी पाठवण्यात आले. त्याच्याऐवजी शफीऊल इस्लामला खेळण्याची संधी देण्यात आली. याच संघातील अनामुल हकला दुखापत झाल्यामुळे इम्रुल कायेसला संघात घेण्यात आले. न्यूझीलंडचा खेळाडू अ‍ॅडम मिल्नेला टाचेच्या दुखापतीमुळे विश्वचषक सोडून मायदेशी परतावे लागले. त्याच्या जागी मॅट हेन्रीला घेण्यात आले. या विश्वचषकात श्रीलंकेच्या चार खेळाडूंना विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. जीवन मेंडिस आणि दिनेश चंडिमल यांना गुडघ्याची दुखापत झाली होती. त्यांच्या जागी उपुल थरंगा आणि कुशल परेरा यांना संधी देण्यात आली. दिमुथ करुणारत्ने आणि रंगना हेराथ यांच्या हाताच्या बोटांना झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषकातील संधीवर पाणी सोडावे लागले. त्यांच्या जागी सीक्यूगे प्रसन्ना आणि थरिंदू कौशल यांना संघात स्थान मिळाले. वेस्ट इंडिजच्या डॅरेन ब्राव्होला गुडघ्याची दुखापत झाल्याने त्याची जागा जॉन्सन चार्लीने घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:13 am

Web Title: cricket world cup 2019 players ruled out of the tournament due to injury zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019 फ्री हिट : विश्वविजेतेपद माहीसाठी जिंकायचंय!
2 cricket world cup 2019 : ..तरीही विश्वचषक आम्हीच जिंकू!
3 cricket world cup 2019 : सेलिब्रिटी कट्टा : उत्तम प्रेक्षक झालो..
Just Now!
X