News Flash

उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान? जाणून घ्या शक्यता…

उपांत्य फेरीची चुरस वाढली

बांगलादेशवर मात करुन टीम इंडियाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियानंतर उपांत्य फेरी गाठणारा भारत दुसरा संघ ठरला आहे. ८ सामन्यांनंतर भारतीय संघ १३ गुणांनिशी दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया १४ गुणांनिशी पहिलं स्थान टिकवून आहे. त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी सध्या पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. मात्र उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणाचं आव्हान असेल, यावरुन आता तर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.

जाणून घेऊयात उपांत्य फेरीत भारतीय संघासमोर कोणाचं आव्हान असेल या शक्यतांबद्दल….

१) उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची शक्यता नाहीच

भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. साखळी फेरीत भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना भारताने जिंकला आणि आणि ऑस्ट्रेलियाचा अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली तर भारत १५ गुणांनिशी पहिल्या स्थानवर जाईल. अखेरच्या सामन्यात भारत हरला आणि ऑस्ट्रेलिया जिंकली, तरीही हे दोन संघ उपांत्य फेरीत समोरासमोर येणार नाहीत. उपांत्य फेरीसाठी भारतासमोर न्यूझीलंड, पाकिस्तान किंवा इंग्लंड यांचं आव्हान असणार आहे.

२) उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध लढत होण्याच्या दोन शक्यता –

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात इंग्लंड जिंकलं तर गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर पोहचतील. दुसरीकडे पाकिस्तान जर अखेरच्या सामन्यात बांगलादेशकडून पराभूत झाला तर त्यांचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. जर भारतीय संघाने गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवलं तर न्यूझीलंड पाकिस्तानच्या पराभवाचा फायदा घेत चौथ्या स्थानावर राहतील. अशा परिस्थितीमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होऊ शकतो.

जर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला आणि न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर पोहचेल. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचं म्हणजेच भारताचं आव्हान येण्याची शक्यता आहे.

३) उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लढत होण्याच्या दोन शक्यता –

उपांत्य सामन्यात भारतासमोर इंग्लंडचं आव्हान येण्याचीही शक्यता आहे. भारत गुणतालिकेत पहिल्या आणि इंग्लंड चौथ्या स्थानावर राहिलं किंवा भारत दुसऱ्या आणि इंग्लंड तिसऱ्या स्थानावर राहिलं तरीही हे दोन संघ उपांत्य फेरीत समोरासमोर येऊ शकतात. इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरुद्ध हरल्यास आणि बांगलादेशने पाकिस्तानवर मात केल्यास इंग्लंड १० गुणांसह चौथ्या स्थानावर राहील. अशा परिस्थिती भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होऊ शकतो.

इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केल्यास १२ गुणांनिशी ते तिसऱ्या स्थानी पोहचील. याचसोबत भारतीय संघ जर दुसऱ्यात स्थानी राहिला तर उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामना होण्याची शक्यता आहे.

४) उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध लढत होण्याची शक्यता –

पाकिस्तानी संघाला गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहचण अशक्य आहे. आपल्या अखेरच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध बाजी मारली तरीही पाकिस्तानच्या खात्यात केवळ ११ गुण जमा होतील. या परिस्थितीत भारत आपला श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा सामना जिंकत पहिल्या स्थानी पोहचला तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे. मात्र भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या शक्यता मावळतील.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली तर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेशाची चांगली संधी आहे. मात्र इंग्लंडने सामन्यात बाजी मारली तर पाकिस्तानला बांगलादेशला मोठ्या फरकाने हरवावं लागणार आहे. त्यामुळे कोणते दोन संघ उपांत्य फेरीचं तिकीट मिळवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2019 6:03 pm

Web Title: cricket world cup 2019 possible opponent before team india for semi final psd 91
Next Stories
1 BLOG : अंबाती रायुडू, टीम इंडियाचा शापित गंधर्व !
2 विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार?
3 ‘मुस्लीम असल्याने शमीची कामगिरी अव्वल’, पाकिस्तानी खेळाडूने तोडले अकलेचे तारे
Just Now!
X