भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ५ जूनला पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे क्रिकेटचे अनेक जाणकार म्हणत आहेत. भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही याच पद्धतीचे विधान केले आहे. अश्विनने भारतीय संघ अंतिम फेरी गाठेल असा विश्वास व्यक्त केला असून त्यांच्याविरोधात कोणता संघ खेळेल याबाबतही भविष्यवाणी केली आहे.

“भारतीय संघ हा यंदाच्या विश्वचषकात सर्वांचा आवडता संघ आहे. भारताची फलंदाजी भक्कम आहे. भारतीय फलंदाजीच्या यादीत पहिले ३ खेळाडू हे रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे आहेत. या तिन्ही खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. रोहित आणि विराट यांनी तर आपण विश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहोत हे आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. विराटचा खेळदेखील परिपक्व आहे. तो डावाला उत्तम गती मिळवून देतो.त्याला रोहित शर्माच्या फटकेबाजीची जोड मिळाली तर भारतीय संघाला कोणीही रोखू शकत नाही”, असे अश्विन म्हणाला.

“रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे तीनही खेळाडू त्यांना हवे तेव्हा फलंदाजीचा गिअर बदलू शकतात आणि धावगती वाढवू शकतात. भारतीय संघ हा तुलनेने बलाढ्य आहे. त्या बरोबरच इंग्लंडचा संघदेखील उत्तम आहे. त्यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल आणि त्याचबरोबर इंग्लंडचा संघ भारताशी अंतिम फेरीत भिडेल”, असा अंदाज अश्विनने व्यक्त केला.

हार्दिक पांड्याच्या खेळीबद्दलही अश्विनने मत व्यक्त केले. “हार्दिक हा एक उत्तम आणि प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास येत आहे. महेंद्रसिंग धोनी हा मधल्या फळीला स्थैर्य देण्यास सक्षम आहे. याशिवाय गोलंदाजीत सुरुवातीचा काळ आणि शेवटच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांचा आणि विशेषतः बुमराहचा मारा भेदक ठरतो. तसेच दोन मनगटी फिरकीपटूदेखील संघात आहेत. त्यामुळे भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्याची पूर्ण संधी आहे”, असेही अश्विनने नमूद केले.