इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने मंगळवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत ५७ चेंडूंत शतक साकारले असले, तरी त्याच्यापेक्षा जलद शतक रशीद खानने झळकावल्याची चर्चा बुधवारी समाजमाध्यमांवर रंगली होती. मॉर्गनने रशीदच्या गोलंदाजीवर तब्बल ११ षटकार लगावले. त्यापैकीच रशीदच्या नवव्या षटकातील पहिल्या चेंडूवर (४९वा चेंडू) षटकार लगावत मॉर्गनने रशीदचे शतक पूर्ण केले, असा विनोद चर्चेत होता. त्याचप्रमाणे ३२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मॉर्गनला धावबाद करण्याच्या प्रयत्नात चुकून त्याचे टी-शर्ट ओढणाऱ्या गुलबदीन नैबची चित्रफीतही समाज माध्यमांवर फिरत होती. त्यासोबत मॉर्गनला बाद करण्याचा एकमेव उपाय, असा गमतीदार मजकूरही काही चाहत्यांनी जोडला.