विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अखेर अपूर्णच राहिलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. साखळी फेरीत अवघा एक पराभव पदरी पडलेला भारतीय संघ उपांत्य सामन्यात न्यूझीलंडसमोर चांगलाच कोलमडला. विजयासाठी दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना रविंद्र जाडेजा आणि धोनीचा अपवाद वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करु शकला नाही.

रविंद्र जाडेजाने उपांत्य सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपली छाप पाडली. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात गोलंदाजी-क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही प्रकारांमध्ये रविंद्र जाडेजा चमकला. मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंडशी दोन हात करणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघामधील विजेता अंतिम फेरीत न्यूझीलंडशी विजेतेपदाशी लढणार आहे.