भारतीय संघाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. विजयासाठी न्यूझीलंडने दिलेलं २४० धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. मोक्याच्या क्षणी रविंद्र जाडेजा आणि धोनी बाद झाल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटला ढकलला गेला.

भारताचा पराभव झाला असला तरीही सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी संघाच्या लढाऊ बाण्याचं कौतुक केलं. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा जाडेजा सर्वांचा हिरो बनला आहे. जाडेजानेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर, “असाच पाठींबा देत रहा मी अखेरच्या श्वासापर्यंत खेळत राहीन” असा संदेश लिहीत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

इतर खेळाडूंच्या तुलनेत रविंद्र जाडेजाला २०१९ विश्वचषक स्पर्धेत कमी संधी मिळाली. मात्र साखळी सामन्यात ज्या ज्या वेळेला जाडेजाला बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी बोलवण्यात आलं त्यावेळी त्याने आपली कामगिरी चोख बजावली. विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.