News Flash

Cricket World Cup 2019 : ड्रोनच्या नजरेतून : साद देती धावशिखरे!

अखंड डाव खेळून फक्त नाबाद ३६ धावा करणाऱ्या सुनील गावस्करच्या ‘कासवछाप’ फलंदाजीची त्यावेळी चर्चा रंगली.

प्रशांत केणी

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या गुणपत्रिका आणि धावफलक यांची पुनर्रचना करण्यात आल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाले. पाचशे धावसंख्येपलीकडच्या नोंदीसुद्धा त्यावर साध्य व्हाव्यात, हीच त्यामागे अपेक्षा होती.

याची काही तात्कालीन कारणेसुद्धा होती. गतवर्षी १९ जूनला नॉटिंगहॅम येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ६ बाद ४८१ धावसंख्येचा विश्वविक्रम साकारला. त्यामुळे पाचशे धावसंख्येचे शिखर आता १९ धावांच्या अंतरावर असल्याची जाणीव क्रिकेटजगताला झाली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिस्टल येथे पाकिस्तानच्या ३५८ धावसंख्येचा इंग्लंडने यशस्वी पाठलाग केला. अगदी २०१५च्या विश्वचषकाचा आढावा घेतल्यास दक्षिण आफ्रिकेने दोनदा आणि ऑस्ट्रेलियाने एकदा चारशे धावसंख्येचा टप्पा ओलांडला.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने यंदाच्या विश्वचषकात पाचशे धावसंख्येहून अधिक धावा होऊ शकतात, असा आशावाद व्यक्त केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ४२१ धावांचा डोंगर उभारून, हे आव्हान कठीण नसल्याची ग्वाहीसुद्धा दिली. त्यानंतर विंडीजचा फलंदाज शाय होपने पाचशेहून अधिक धावसंख्या वेस्ट इंडिजच उभारेल, असा इशारा क्रिकेटविश्वाला दिला आहे.

एकदिवसीय विश्वचषकाचा युगारंभ लॉर्ड्समध्ये ९ जून १९७५ या दिवशी झाला. यजमान इंग्लंडशी पहिलाच सामना खेळण्याचा मान भारताला मिळाला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३३४ अशी धावसंख्या उभारली. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताने ६० षटकांत जेमतेम ३ बाद १३२ धावा केल्या. अखंड डाव खेळून फक्त नाबाद ३६ धावा करणाऱ्या सुनील गावस्करच्या ‘कासवछाप’ फलंदाजीची त्यावेळी चर्चा रंगली. पण भारतीय संघाने १९८३च्या विश्वचषकापासून कात टाकली. इतकेच कशाला? धावसंख्येच्या शर्यतीत भारतसुद्धा नेहमीच अग्रेसर मानला जातो. २००७च्या विश्वचषकात भारताने बम्र्युडाविरुद्ध ४१३ धावा उभारल्या होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चारशेचा टप्पा भारताने पाच वेळा ओलांडला आहे, तर रोहित शर्माने तीनदा वैयक्तिक द्विशतक साकारले आहे.

१९९२ पासून क्षेत्ररक्षणावर बंधने आणणारा आणि गोलंदाजांवर हल्ला करण्यासाठी फलंदाजांना प्रेरक ठरणारा ‘पॉवरप्ले’अस्तित्वात आला. यावेळी पुढील क्रमांकावरील आक्रमक फलंदाजाला बेफाम फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजीच्या क्रमात बढती देणारी ‘पिंच हिटर’ ही संकल्पना रूढ झाली. १९९६च्या विश्वचषकात श्रीलंकेचा कर्णधार अर्जुन रणतुंगाने नावीण्यपूर्ण रणनीती आखली. सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथर्णाला सलामीला पाठवून मुक्त फटकेबाजी करण्याची सूचना दिली. पहिल्या १५ षटकांचा क्षेत्ररक्षणाच्या बंधनाचा फायदा उचलत ही जोडी धावांचे इमले बांधायची. त्या चालीमुळे एकदिवसीय क्रिकेटला अधिक वेगवान केले आणि श्रीलंकेला विश्वविजेतेपद मिळवून दिले.

२००५पासून ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या अतिवेगवान अध्यायाला प्रारंभ झाला. त्यामुळे फलंदाजांच्या आक्रमकतेला खतपाणी घातले गेले. नवे फटके फलंदाज आजमावू लागले. अधिक जोखीम पत्करू लागले. १९८७ ते १९९९ या कालखंडातील ५० षटकांच्या पहिल्या चार विश्वचषकांमध्ये तीनशे धावसंख्येचा टप्पा ओलांडल्याची फक्त दोन उदाहरणे आढळतात. पण त्यानंतरच्या (२००३पासून) चार विश्वचषकांमध्ये हा टप्पा ३९ वेळा ओलांडला गेला आहे.

मागील विश्वचषकापासून आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम दोनदा मोडीत निघाला आहे. आता प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केलेली तीनशेहून अधिक धावसंख्यासुद्धा सुरक्षित राखणे आव्हानात्मक ठरते. २०१५च्या विश्वचषकापासून आतापर्यंत झालेल्या ४६९ सामन्यांपैकी १२८ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीनशेपल्याड धावसंख्या उभारली. यापैकी २३ टक्के सामन्यांमध्ये त्याचा यशस्वी पाठलाग केला गेल्याचे आकडेवारी सांगते.

इंग्लंडमधील खेळपट्टय़ा आणि वातावरण तर फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. परंतु प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा तीनशे धावसंख्येचा टप्पा गाठणे फारशे कठीण नसेल. गेल्या चार वर्षांत इंग्लंडमध्ये झालेल्या ५६ सामन्यांत तीनशे किंवा त्याहून अधिक धावा केल्या गेल्या. यापैकी १८ सामन्यांत त्याचा यशस्वी पाठलाग केला गेला.

त्यामुळे इंग्लंडमधील १२व्या विश्वचषकात पाचशे धावसंख्येचे शिखर सर होणार अशी अपेक्षा केली जात आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज या संघांकडून हे साध्य होऊ शकते, असा क्रिकेटधुरिणांचा अंदाज आहे. या पाश्र्वभूमीवर फलंदाजांच्या विश्वचषकाविषयीचे औत्सुक्य अधिक वाढले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 2:36 am

Web Title: cricket world cup 2019 reconstruction of point table and scoreboards
Next Stories
1 cricket world cup 2019 : सेलिब्रिटी कट्टा : वेळ काढून सामने पाहणार!
2 cricket world cup 2019 : आकडेपट : विजयाचे अंतर.. एक तप!
3 Cricket World Cup 2019 :  # चर्चा तर होणारच.. : कोहिनूर की ‘कोहलीनूर’!
Just Now!
X