२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा या दोन्ही खेळाडूंना भारतीय संघात जागा द्यावी असा सल्ला, माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने दिला आहे. तो India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

“भारतीय संघ व्यवस्थापनासमोर अंतिम संघासाठी रविंद्र जाडेजा हा एक चांगला पर्याय आहे. जर दिनेश कार्तिक संघात सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असेल तर त्याच्या जागी रविंद्र जाडेजा चांगला पर्याय आहे. त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी संघासाठी उपयुक्त ठरु शकते. उपांत्य फेरीसारख्या महत्वाच्या सामन्यात तुम्हाला असा पर्याय संघात असणं गरजेचं आहे.” याचसोबत सचिनने मोहम्मद शमीलाही संघात स्थान मिळण्याबाबत आपलं मत दिलं आहे.

मोहम्मद शमीलाही उपांत्य सामन्यात संघात स्थान मिळायला हवं. कारण याच मैदानावर भारताने वेस्ट इंडिजवर मात केली होती, आणि शमीने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे उपांत्य सामन्यात त्याला अंतिम संघात स्थान मिळायला हवं, तो तुम्हाला महत्वाच्या विकेट काढून देऊ शकतो. सचिन शमीबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.