बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा, ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकलं आहे.

२००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सचिनने ११ डावांमध्ये ७ अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर यंदाच्या स्पर्धेत शाकीबने ८ डावांमध्ये ७ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्याच्या या आकडेवारीवरुन यंदाची स्पर्धा त्याच्यासाठी किती लाभदायी गेली आहे याचा अंदाज येतो.

याचसोबत या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या आठही सामन्यांमध्ये शाकीबने ४० ही धावसंख्या ओलांडली आहे. विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा शाकीब पहिला फलंदाज ठरला आहे.

पाकिस्तानने दिलेल्या ३१६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शाकीब अल हसनने बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुशफिकुर रहिम आणि लिटन दास यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत शाकीबने आपलं अर्धशतकही साजरं केलं. अखेरीस ६४ धावांवर शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सरफराजकडे झेल देत तो माघारी परतला.