ऋषिकेश बामणे

आधुनिक क्रिकेटमध्ये विशेषत: मर्यादित षटकांच्या सामन्यांत गोलंदाजांना चुका करण्यास फारच कमी वाव असतो. त्यातही मनगटी फिरकी गोलंदाजांना पाहून फलंदाजांना धाव लुटण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र १०-१५ वर्षांपूर्वी चित्र वेगळे होते. शेन वॉर्न, अनिल कुंबळे, पॉल अ‍ॅडम्स यांसारख्या महान मनगटी गोलंदाजांनी भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. परंतु त्यांच्या निवृत्तीनंतर मनगटी फिरकी गोलंदाजांची संख्या अचानक कमी होण्यास सुरुवात झाली. त्यातही मर्यादित षटकांचे क्रिकेट मनगटी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ बनत गेल्याने ऑफ-स्पिन (बोटाने चेंडू वळवणारे) टाकणाऱ्यांचा भाव वधारला. मात्र सध्या सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जिगरबाज आणि पोलादी मनगटी फिरकीपटूंवरच बहुंताश संघांची भिस्त आहे, हे पुन्हा सिद्ध होत आहे.

सध्याच्या घडीला मनगटी गोलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास भारताच्या कुलदीप यादवचे नाव साहजिकच सर्वप्रथम येते. डाव्या हाताने ‘चायनामन’ गोलंदाजी करणाऱ्या कुलदीपने २०१७ च्या चॅम्पियन्स करंडकानंतर ११ ते ४० षटकांत सर्वाधिक ८० बळी मिळवले आहेत. विश्वचषकापूर्वी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) कुलदीपला फक्त चार बळी मिळवण्यात यश आले असले तरी त्याचे भारतीय संघातील स्थान नेहमीच पक्के मानले जाते. त्याशिवाय यंदाच्या वर्षांत आतापर्यंत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्यांच्या यादीत कुलदीप १४ सामन्यांतून २३ बळींसह चौथ्या क्रमांकावर असून त्या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव फिरकीपटू आहे.

कुलदीपइतके बळी नावावर नसले तरी त्याच्याच तोडीसतोड कामगिरी करणाऱ्या २८ वर्षीय यजुर्वेद्र चहलला क्रिकेटपंडितांकडून बहाल करण्यात आलेली ‘चतुर चहल’ पदवी त्याच्या गोलंदाजीला साजेशी आहे. चेंडूला उंची देण्यात किंचीतही संकोच न बाळगता चहल एका बाजूने धावा रोखतो व याचाच फायदा उचलून दुसऱ्या बाजूने कुलदीप बळी मिळवतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विराट कोहलीसोबत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळत असल्यामुळे कोहलीला मोक्याच्या क्षणी बळींची आवश्यकता असते, त्यावेळी तो चहलकडे चेंडू सोपवतो. २०१८पासून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजांच्या यादीत चहल ४८ बळींसह कुलदीपनंतर दुसऱ्या स्थानी आहे. कुलदीप-चहल (कुलचा) या जोडीमुळेच गेल्या दोन वर्षांत भारताने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवरील एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला.

बाद झालेला फलंदाज कोणीही असो, पण तितक्याच उत्साहाने संपूर्ण मैदानात हात उंचावून फेरी मारत आनंद साजरा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या इम्रान ताहीरचे सर्वच चाहते आहेत. समोर कोणताही संघ असला तरी ताहीर हमखास बळी मिळवून देतो. लेग-स्पिनशिवाय गुगली, दूसरा, फ्लिपर यांसारखे विविध चेंडू टाकण्यात ताहीर पटाईत आहे. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक २६ बळी मिळवून ‘पर्पल कॅप’ पटकावणारा ताहीर कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळत आहे. मात्र वयाच्या ४०व्या वर्षीसुद्धा त्याचा जोश व जिद्द एखाद्या पंचविशीतील गोलंदाजाप्रमाणेच आहे. दुर्दैवाने त्याच्या योगदानानंतरही आफ्रिकेला अद्याप या विश्वचषकात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानची काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या ईऑन मॉर्गनने तब्बल ११ षटकार ठोकत यथेच्छ धुलाई केली. मात्र जागतिक ट्वेन्टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला रशीद हा अशा कामगिरीमुळे खचणारा गोलंदाज नसून तो नक्कीच झोकात पुनरागमन करेल. २०१८च्या ‘आयपीएल’मध्ये रशीदने २१ बळी मिळवत धुमाकूळ घातला, तर २०१८च्या आशिया चषकात भारताविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात रशीदने मोलाची भूमिका बजावली होती. विश्वचषकात मात्र त्याला नक्कीच कामगिरी सुधारण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम झम्पा व इंग्लंडचा आदिल रशीद यांनीही स्वत:चे कौशल्य सिद्ध केले असून न्यूझीलंडच्या इश सोधीला तूर्तास एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. परंतु यांसारख्या सर्व फिरकी गोलंदाजांच्या मनगटांवर आपापल्या संघांची किती भिस्त आहे, हे या विश्वचषकाने दाखवून दिले आहे.

यंदाच्या विश्वचषकातील कामगिरी

गोलंदाज       सामने  बळी

इम्रान ताहीर     ५      ८

यजुर्वेद्र चहल    ३      ३

आदिल रशीद    ५      ५

अ‍ॅडम झम्पा      ३      ४

कुलदीप यादव   ३      ३