X
X

World Cup 2019 : विराटने शास्त्रींचं ऐकलं नाही आणि सामना गमावला

...तर सामन्याचं चित्र बदललं असतं

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत अव्वल कामगिरी करत पहिलं स्थान मिळवलेल्या भारतीय संघाला, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचे पहिले ३ फलंदाज अवघ्या पाच धावांमध्ये माघारी परतले. चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीला कोण येणार या प्रश्नाने भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेतही पाठ सोडली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, उपांत्य सामन्यात विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबद्दल विचार झाला होता. मात्र ऐनवेळी भारतीय फलंदाजी कोलमडल्यामुळे विराट तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजीसाठी आला.

अवश्य वाचा – शास्त्रींच्या व्यवस्थापनावर ‘दादा’चं प्रश्नचिन्ह, धोनीला उशीरा फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयावर टीका

न्यूझीलंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे फलंदाज मैदानावर उतरले. यावेळी विराट कोहली पॅडींग करुन तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये तयार होता. यादरम्यान प्रशिक्षक रवी शास्त्री, सहायक प्रशिक्षक संजय बांगर आणि धोनी यांच्यात विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला जाऊ शकतो का याबद्दल चर्चा झाली. “पंत किंवा पांड्या दोघांपैकी कुणीतरी मैदानात उतरल्यावर काही षटकं फक्त खेळून काढायला हवी होती. मैदानात उतरल्यावर पहिल्या दहा षटकांचं लक्ष्य यासाठी ठेवलं असतं आणि ही षटकं खेळून काढली असती तर सामन्याचं चित्र वेगळं असतं,” सूत्रांनी सांगितलं.

अवश्य वाचा – विराट कोहली – जसप्रीत बुमराहला विंडीज दौऱ्यातून विश्रांती ?

पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणार हा अंदाज भारतीय संघ व्यवस्थापनाने बांधला होता. यासाठीच विराटची विकेट राखण्यासाठी पंत किंवा पांड्याला फलंदाजीत विराटच्या आधी पाठवण्याबद्दल विचार सुरु होता. मात्र सलामीवीर रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर विराटने थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. जर ड्रेसिंग रुममध्ये झालेल्या चर्चेनुसार विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर कदाचीत सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मात्र गोष्टी ठरवल्याप्रमाणे कधीच होत नाहीत. सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली. दरम्यान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटलाही फारसा प्रभाव दाखवता आला नाही. अवघी एक धाव काढून तो माघारी परतला. यानंतर भारतीय डावाची झालेली पडझड ही सर्वांनीच पाहिली आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज नसणं आम्हाला भोवलं – रवी शास्त्री

20
  • Tags: ms-dhoni, ravi-shastri, virat-kohli,
  • Just Now!
    X