ICC च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला होणार आहे. हा सामना जिंकून स्पर्धेत विजयी सलामी देण्याच्या तयारीने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. रविवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे आफ्रिकेचा संघ दमदार पुनरागमन करू शकतो. पण या दरम्यान बांगलादेशच्या बाबतीत जर या विश्वचषकात एक योगायोग जुळून आला, तर मात्र बांगलादेशचा संघ भारत आणि इतर बलाढ्य संघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

रविवारी बांगलादेशचा सलामीचा सामना आफ्रिकेशी झाला. अनुभवी डावखुरा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानची भेदक गोलंदाजी तसेच शकिब अल हसन आणि मुशफिकर रहिम यांच्या जोडीने साकारलेल्या शतकी भागीदारीच्या बळावर बांगलादेशने रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत केले. स्पर्धेतील हा दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव ठरला, तर बांगलादेशने मात्र विजय सलामी दिली.

बांगलादेशने विश्वचषक स्पर्धेत या आधी दोन वेळा सलामीचा सामना जिंकला होता. महत्वाचे म्हणजे या दोनही वेळा बांगलादेशचा संघ दुसऱ्या फेरीत पोहोचला होता. २००७ साली बांगलादेशने सलामीचा सामना जिंकून ‘सुपर ८’मध्ये प्रवेश केला होता, तर २०१५ मध्ये बांग्लादेशच्या संघाने सलामीचा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. योगायोगाने बांगलादेशने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही सलामीचा सामना जिंकला. यंदाची स्पर्धा ही राऊंड रॉबिन पद्धतीची आहे. त्यामुळे या स्पर्धेत दुसरी फेरी ही थेट उपांत्य फेरी असणार आहे. त्यामुळे जर बांगलादेशच्या बाबतीत हा योगायोग जुळून आला, तर भारतासह इतर बलाढ्य संघांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाने सराव सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. पण विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि बलाढ्य आफ्रिकेला धूळ चारली. त्यामुळे भारतीय संघासाठी पाकिस्तानपेक्षाही बांग्लादेशचा संघ अधिक डोकेदुखी ठरू शकते असे क्रिकेट जाणकारांचे मत आहे.