इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात झाली. या स्पर्धेत इतर सर्व संघाचे किमान सलामीचे सामने झाले आहेत. पण भारतीय संघाचा सलामीचा सामना उद्या (५ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत आफ्रिकेने २ सामने खेळले असून दोनही सामने त्यांना गमवावे लागले. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या उद्देशाने त्यांचा संघ उतरेल. तर दुसरीकडे भारतीय संघाचा हा सलामीचा सामना असल्याने विजयी सलामी देण्याच्या उद्देशाने टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. मात्र भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने तर स्पर्धेचाच निकाल सांगून टाकला आहे.

भारतीय संघ हा विश्वचषक स्पर्धेचा प्रबळ दावेदार आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे. भारताचा संघ समतोल आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा विश्वचषक जिंकण्याची नामी संधी आहे, असेदेखील अनेक क्रिकेट जाणकारांनी आणि माजी क्रीडापटूंनी म्हटले आहे. या दरम्यान एका चाहत्याने The Souled Store या ट्विटर हँडलवरून माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याला प्रश्न विचारला. “वीरू पाजी, यंदा विश्वचषक भारतात येणार का?” असे ट्विट करत त्याने सेहवागला प्रश्न केला.

आपल्या कल्पक आणि हटके ट्विटसाठी कायम चर्चेत असलेल्या सेहवागने या प्रश्नाचेही उत्तर तशाच हटके पद्धतीने दिले. भारत यंदा विश्वचषक जिंकणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना सेहवागने ट्विट केले, “ही काय विचारायची गोष्ट झाली? पूर्ण भारताला माहिती आहे की यंदाचा विश्वचषक आपलाच आहे.”

दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानेही नुकत्याच एका कार्यक्रमात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल असे मत व्यक्त केला होते. “भारतीय संघ हा यंदाच्या विश्वचषकात सर्वांचा आवडता संघ आहे. भारताची फलंदाजी भक्कम आहे. भारतीय फलंदाजीच्या यादीत पहिले ३ खेळाडू हे रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे आहेत. या तिन्ही खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. रोहित आणि विराट यांनी तर आपण विश्वातील सर्वोत्तम फलंदाज आहोत हे आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. विराटचा खेळदेखील परिपक्व आहे. तो डावाला उत्तम गती मिळवून देतो.त्याला रोहित शर्माच्या फटकेबाजीची जोड मिळाली तर भारतीय संघाला कोणीही रोखू शकत नाही”, असे अश्विन म्हणाला.

२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून

भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून

भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून

भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून

भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून

भारत विरुद्ध बांगलादेश – २ जुलै

भारत विरुद्ध श्रीलंका – ६ जुलै