प्रा. संतोष सावंत

महाराज विक्रमादित्यांनी नेहमीप्रमाणे आपला मोर्चा जंगलाच्या दिशेने वळवला. जसजसे ते जंगलाच्या अंतर्गर्भात शिरू लागले, तसतसे अरण्य अधिकच निबीड होऊ  लागले. अंधार अधिक गडद होऊ  लागला. जंगली श्वापदांच्या भयग्रस्त करणाऱ्या आवाजाची तीव्रता वाढू लागली. नेहमीची पायाखालची वाट असल्याने विक्रमादित्यांना ‘जीपीएस’ ऑन करण्याची आवश्यकता नव्हती. निर्भयपणे ते त्या झाडाजवळ जाऊन पोहोचले आणि त्यांनी प्रेत म्हणजेच वेताळाला आपल्या खांद्यावर घेतले.

वेताळ आपल्या नेहमीच्या भयानक शैलीत हसला आणि म्हणाला, ‘‘विक्रमा, तुला कितीही समजावले तरी तू आपला हट्ट सोडणार नाहीस असेच दिसते. चल आपला प्रवास सुसह्य व्हावा म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. अट आपली नेहमीचीच. तू एकही शब्द बोलायचे नाहीस. जर तू बोललास तर मी पुन्हा माझ्या झाडावर उडून जाईन!’’

महाराज विक्रमादित्यांनी संमतीदर्शक मान हलवली आणि वेताळाने आपल्या गोष्टीला सुरुवात केली.

‘‘फार फार वर्षांपूर्वी कॅरेबियन नावाची एक नगरी होती. अनेक लहान राज्यांचा तो समूह होता. परंतु येथील लोक आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाबाबत जागरूक होते. यांच्या वैशिष्टय़पूर्ण जिंदादिल स्वभावामुळे आणि खिलाडूवृत्तीमुळे येथील उंचपुरे रहिवासी जगभर प्रसिद्ध होते. गॅरी सोबर्स, लान्स गिब्ज, गॉर्डन ग्रीनिज, जॉर्ज हेडली, क्लाइव्ह लॉईड, ब्रायन लारा अशा असंख्य राजकुमारांनी आपल्या अंगभूत कौशल्याच्या आणि पराक्रमाच्या बळावर जगभरातील रसिकांची वाहवा मिळवली होती.’’

‘‘राजा तू हुशार आहेस. मी घेतलेल्या नावांव्यतिरिक्त आणखीही अनेक दिग्गज राजकुमार होऊन गेले, ज्यांनी आपल्या प्रांताचे नाव आपापल्या कर्तृत्वाने उंचावले. यांची माहिती तू ‘गूगल’ केलेस तर सहज मिळवू शकतोस.’’

‘‘सलग दोन वेळेस विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याचा विक्रम सर्वप्रथम ज्या प्रांताने केला, तो प्रांत आज आठव्या क्रमांकावर आहे. त्यांचे सैन्यबळ आजही वाखणण्याजोगे आहे. ख्रिस गेल, आंद्रे रसल यांच्यासारखे एक हाती युद्ध जिंकून देणारे झुंजार सेनापती यांच्या सैन्यात आहेत. एकेक योद्धा संपूर्ण देशाला भारी पडू शकतो असे युवा वीरही यांच्या दलात आहेत. पण.. विक्रमा हा पणच त्रासदायक आहे. आपला सुवर्णकाळ परत आणण्यात ते सातत्याने अपयशी ठरत आहेत. असे का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तू देऊ शकला नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी पडतील.’’ (एवढे बोलून वेताळ थांबला.)

राजा विक्रम बोलू लागला, ‘‘वेताळा, तुझ्या प्रश्नातच तुझे उत्तर दडलेले आहे. परिस्थिती बदलायची असेल तर ती स्वीकारायला हवी. आपापसातील कुरबुरींना तिलांजली द्यायला हवी. युद्ध जिंकायचे असेल तर प्रभावी नेतृत्व हवेच. पण या नेतृत्वावर सर्वानी विश्वासही ठेवायला हवा. वैयक्तिक पराक्रम महत्त्वाचा आहेच, पण तो युद्ध जिंकण्यासाठीही उपयोगी ठरायला हवा. ज्या सैन्याला स्वत:च्या सामर्थ्यस्थळांसोबतच मर्यादांची जाणीव असते, तेच बाजी मारते. आपल्या पराक्रमाची कक्षा युद्धाला साजेशी रुंदावण्यात जे वीर यशस्वी होतात, तेच अंती विजयी ठरतात. हे मर्म लक्षात घेतले तर या महापराक्रमी वीरांना आपल्या प्रांताचे नाव सुवर्णाक्षरात लिहिण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

विक्रमाचे उत्तर ऐकून वेताळ प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘‘राजा तू शूर आणि धाडसी तर आहेसच पण अत्यंत बुद्धिमानही आहेस. तुझे उत्तर अगदी समर्पक आहे. पण तू बोललास त्यामुळे मी हा निघालो.’’

त्याक्षणी विक्रमाच्या खांद्यावरून वेताळ उडाला आणि पुन्हा आपल्या झाडाला जाऊना लटकला.