गौरव जोशी

इंग्लंडच्या ओव्हल रेल्वे स्टेशनवर उतरून मैदानाकडे आपण जायला लागतो त्या वेळी तेथील मोठय़ा पायऱ्यांवरून वर येताना दोन्ही बाजूंनी विराट कोहलीचे भव्य फलक डोळ्यांना दिसू लागतात. विश्वचषकाचा उत्साह तिथे जाणवू लागतो; परंतु तुम्ही बाहेर रस्त्यावर येऊन ओव्हल मैदानाकडे येऊ लागता, तसे वेगळेच दृश्य दिसू लागते. जसे भारतात सर्वत्र क्रिकेटवेड दिसत असते, तसे इंग्लंडच्या या मध्यवर्ती भागात कुठेही वेगवेगळ्या देशांचे झेंडे, क्रिकेटप्रेमी किंवा विश्वचषकाचा माहोल दिसत नाही. बऱ्यापैकी शांतता आहे. कुठेही लांबच्या लांब रांगा किंवा क्रिकेटप्रेमींची गर्दी दिसत नाही.

क्रिकेटप्रेमींमधील जो उत्साह भारत, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये दिसतो, तो इथे दिसला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे फलक, जाहिराती दिसतात. मात्र अन्य कुठेच क्रिकेटमय जल्लोष नाही. सामने असलेल्या शहरांमध्ये वेगवेगळ्या देशांचे लोक दिसतील, झेंडे मिरवतील अशी अपेक्षादेखील फोल ठरते. सराव सामन्यांना तर केवळ अफगाणिस्तानचे समर्थक त्यांचे पारंपरिक पोशाख घालून आलेले दिसले. विश्वचषकातील सामन्यांना इंग्लंडचे समर्थक नागरिक फारसे आलेले दिसले नाही. या विश्वचषकातील उत्साह हा खऱ्या अर्थाने भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशच्या स्थायिक लोकांकडूनच दिसणार आहे. येथील १० टक्के लोकसंख्या ही भारतीय उपखंडातील व आशियाई नागरिकांची आहे. त्यांनाच विश्वचषकात रस आहे.

विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर जेव्हा आपण वर्तमानपत्रे पाहतो, तेव्हा त्या वर्तमानपत्रांमध्ये विश्वचषकाचे प्रतिनिधित्व फार कमी दिसून येते. वर्तमानपत्रांमधील क्रीडाच्या पाच पानांवर क्रिकेटचे अस्तित्व नगण्य आहे. कारण इथे अजून फुटबॉलचा हंगाम जोरात सुरू आहे. सर्व संघांचे कर्णधार आणि मोठय़ा कलाकारांच्या उपस्थितीत लंडनमध्ये विश्वचषकाचा प्रारंभ झाला. मात्र त्या वेळी जे नागरिक बघायला आले होते, त्यापैकी बहुतांश मंडळी ही भारत किंवा पाकिस्तानी समर्थकच होती. इंग्लंडमधील नागरिक दिसतच नव्हते. पहिल्या सामन्याच्या दिवशीही हीच उणीव जाणवली. कारण त्या दिवशी चेल्सी आणि अर्सेनलची युरोपियन लीगची अंतिम फेरी होती.

जोपर्यंत टॉटनहॅम आणि लिव्हरपूल यांच्यातील चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना होत नाही, तोपर्यंत क्रिकेट विश्वचषकाचा उत्साह दिसून येईल, असे वाटत नाही. हॉटेल आणि पबमध्ये खूप जाहिरातबाजी केली जाते, ‘विश्वचषक आहे आमच्याकडे या!’ पण त्या तुलनेत विश्वचषकाचा उत्साह दिसून येत नाही. त्याउलट लिव्हरपूल आणि टॉटनहॅमच्याच अंतिम सामन्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दुसरी बाब अशी की, इंग्लंडमध्ये अजून प्रारंभीचा एक महिना शाळा सुरू आहेत, परीक्षांचा हंगाम आहे. त्यामुळे शाळा सुरू असेपर्यंत मुलांना मैदानावर आणणे किंवा टीव्ही पाहायला देणे कठीण आहे. एका अर्थाने विश्वचषकाचे वेळापत्रक चुकले आहे, असे मला वाटते. तसेच भारतात जसे टीव्हीवर अत्यंत कमी पैशांमध्ये वाहिनी उपलब्ध असतात, तसे इंग्लंडमध्ये नाही. केवळ २५ टक्के नागरिकांकडेच या स्काय स्पोर्ट्सचे पॅकेजेस आहेत. अशा परिस्थितीत सर्वाना टीव्हीवर सामने बघायला मिळणार नाहीत. त्यामुळे सामने टीव्हीवर बघणार कसे? ही एक मोठी समस्या आहे.

परंतु भारताचा सामना ५ जूनपासून असल्याने भारतीय समर्थक इंग्लंडच्या ज्या मॅँचेस्टर, लंडन, बर्मिगहॅम, नॉटिंगहॅम, लीड्स या भागांमध्ये प्रामुख्याने उत्साह दिसायला लागतो त्या तुलनेत ग्रामीण भागातील ब्रिस्टल, टॉँटन अशा भागांत तर अजिबात उत्साह दिसत नाही. इंग्लंडने पहिला सामना दणक्यात जिंकला आहे. भारत, पाकिस्तानचे प्रारंभीचे सामने झाले की वातावरणनिर्मितीला वेग येईल. कदाचित फुटबॉलचा ज्वर संपल्यावर इंग्लंडमध्ये क्रिकेटचा विश्वचषक खऱ्या अर्थाने रंगायला लागेल. त्यानंतरच कदाचित इंग्लिश नागरिकांमध्ये, वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांमध्येदेखील क्रिकेट केंद्रस्थानी येऊ शकेल.