भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २०१९ विश्वचषक स्पर्धेत आश्वासक फॉर्मात आहे. विंडीजविरुद्ध सामन्यात विराट कोहलीने ७२ धावांची खेळी केली. वन-डे क्रिकेटच्या इतिहासातलं कोहलीचं हे ५३ वं अर्धशतक ठरलं. याचसोबत विश्वचषक स्पर्धेत ४ सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला. अझरुद्दीनच्या नावावर एका विश्वचषक स्पर्धेत ३ अर्धशतकं जमा आहेत.

एकीकडे इतर भारतीय फलंदाज विंडीजच्या माऱ्यासमोर माघारी परतत असताना विराटने मैदानावर तग धरत भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. सचिनने माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. कोहलीने लोकेश राहुल आणि महेंद्रसिंह धोनीसोबत मोलाची भागीदारी केली. विंडीजविरुद्ध सामन्यात विराटने जबाबदारीने फलंदाजी करत ८ चौकार लगावले. या स्पर्धेत भारतासमोर रविवारी यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे.