२०१९ विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध चांगली टक्कर मिळाली आहे. अफगाणि फिरकीपटूंच्या जाळ्यात भारताच्या आघाडीच्या फळीतले फलंदाज अडकले. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विजय शंकर हे झटपट माघारी परतले. मोहम्मद नबी, मुजीब उर रेहमान आणि रहमत शाह यांच्या फिरकीपुढे भारताचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. मात्र कर्णधार विराट कोहलीने अफगाणी गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकी खेळीची नोंद केली.

विराटने ६३ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने ६७ धावा केल्या. या कामगिरीसह विराटने २७ वर्षांपूर्वी भारतीय कर्णधाराने केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९२ साली भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने सलग ३ सामन्यांत अर्धशतक झळकावलं होतं. यानंतर तब्बल २७ वर्षांनी विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात विराटने ८२, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ७७ तर अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात ६७ धावा केल्या.

अवश्य वाचा – World Cup 2019 : मुजीब उर रेहमानचा पराक्रम, दिग्गज गोलंदाजांना न जमलेली केली कामगिरी

रोहित शर्मा लवकर माघारी परतल्यानंतर विराटने दुसऱ्या विकेटसाठी लोकेश राहुलसह ५७ आणि तिसऱ्या विकेटसाठी विजय शंकरसह ५८ धावांची भागीदारी केली. दरम्यान त्याने वन डे क्रिकेटमधील ५२ वे अर्धशतकही पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे चौथे, तर अफगाणिस्तानविरुद्ध पहिलेच अर्धशतक ठरले. विराटची ही झुंज मोहम्मद नबीनं संपुष्टात आणली.

अवश्य वाचा – World Cup 2019 : संधी हुकल्यानंतर मी अधिक सकारात्मक झालो – ऋषभ पंत