News Flash

cricket world cup 2019 फ्री हिट : विश्वविजेतेपद माहीसाठी जिंकायचंय!

धावपळीतूनही विराटने अनुष्कासाठी लिहिले पत्र-

संतोष सावंत

भारताचा कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी आव्हानाचा गांभीर्याने विचार करीत आहे. यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्मा चित्रीकरणाच्या निमित्ताने बेल्जियमला गेली आहे. परंतु या धावपळीतूनही विराटने अनुष्कासाठी लिहिलेले हे पत्र-

प्रिय अनुष्का,

कशी आहेस? खरं तर अगदी दोनच दिवसांचा विरह आहे आपला. दोनच दिवसांपूर्वी तू तुझ्या कामासाठी बेल्जियमला रवाना झालीस, पण असं वाटतंय की खूप दिवस आपण एकमेकांपासून दूर आहोत. तसा मी दौऱ्यावर असताना रोज न चुकता तू व्हिडीओ कॉल करतेस मला. अगं, पण चित्र आणि प्रत्यक्ष यातील अंतर उरतंच ना..

२०१३मध्ये आपली झालेली पहिली भेट मला सारखी आठवतेय. श्ॉम्पूची ती अ‍ॅड आणि तुझं ते लोभसवाणं हास्य.. तिथून हा प्रेमप्रवास सुरू झाला आणि मग काही वर्षांनी सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक आपल्यात निर्माण झालेला दुरावा. मला का कोण जाणे, पण तुझी सारखी आठवण येतेय. तू लवकरच परत येणार आहेस हे ठाऊक असूनसुद्धा..

याला कारण आहे, कालपासून सुरू असलेला माझा आणि तुझा लपंडाव.. जेव्हा तू पहिल्यांदा फोन करत होतीस, तेव्हा मी सराव सत्रामध्ये होतो. दुसऱ्यांदा केलास, तेव्हा मी जिममध्ये होतो आणि तिसऱ्यांदा केलास तेव्हा संघाची बैठक सुरू होती. तुला तर माहीतच आहे. या सगळ्यांबाबत मी किती जागरूक आहे ते. क्रिकेट हेच माझं सर्वस्व आहे. तू देखील आहेस, बरं का! नाही तर लगेच बसशील गाल फुगवून.. आणि हो, मीही बऱ्याचदा तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तूसुद्धा कामातच होतीस.. कधी मेकअप तर कधी शूटिंग सुरू होतं. शेवटी कंटाळून हा पत्र लिहिण्याचा जुनापुराणा पर्याय स्वीकारला मी. ‘मनातील भावना पत्रात उतरवण्यात जी गंमत आहे ती आजच्या पिढीला कळणारच नाही,’ असं सुनील गावस्कर सर कुणालातरी काल सांगत होते. आणि तुला तर माहीतच आहे कोणी जमणार नाही असं म्हटलं की मुद्दामहून तेच करतो मी.

अगं, तुला एक गंमत सांगायची होती. काल लोकेश राहुल आणि हार्दिक पंडय़ा गप्पा मारत उभे होते लॉबीमध्ये. मी सहज म्हटलं, ‘मस्त गारवा आहे, चला कॉफी घेऊ या!’.. तर दोघे चक्क पळूनच गेले. ते ‘करण’ प्रकरण झाल्यापासून दोघांनीही धसकाच घेतलाय कॉफीचा.

आपल्या क्रिकेट मंडळाचे आभारच मानायला हवेत, ज्यांनी क्रिकेटपटूंना आपल्या सहचारिणीला विश्वचषकासाठी सोबत आणण्याची परवानगी दिली आहे. जास्तीत जास्त १५ दिवसांच्या सहवासाची अट घालण्यात आलीय, पण आपल्याला तिचं काही नाही एवढं. कारण आपण तर प्रत्येक नियम कटाक्षानं पाळतो. आता भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचेल, याची खात्री वाटते आहे. हे विश्वविजेतेपद माहीसाठी जिंकायचे आहे.

सहचारिणीचा आपल्या यशात महत्त्वाचा वाटा असतो, असे माही नेहमी म्हणतो. माझ्या यशातसुद्धा तुझाच मोठा वाटा आहे. खराब खेळल्यामुळे तुझी बोलणी खावी लागू नयेत आणि तुला सोशल मीडियावर नेटिझन्सने त्रास देऊ नये म्हणून माझ्या सामन्यापासूनसुद्धा तुला दूर ठेवतो. पाहा माझ्या डोळ्यांत अश्रू आले आता..

मला खात्री आहे की हे पत्र वाचताच तू उडत उडत म्हणजेच विमानानं माझ्याकडे परत येशील.

तुझा लाडका,

विराट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:10 am

Web Title: cricket world cup 2019 virat kohli letter to anushka sharma zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019 : ..तरीही विश्वचषक आम्हीच जिंकू!
2 cricket world cup 2019 : सेलिब्रिटी कट्टा : उत्तम प्रेक्षक झालो..
3 cricket world cup 2019 : आकडेपट : हीरकमहोत्सवी विजयाचे लक्ष्य
Just Now!
X