अटीतटीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरोधात अवघ्या 5 धावांनी निसटता विजय मिळवला. या विजयासोबतच किवी संघाने विश्वचषकातील पाचव्या विजयाची नोंद केली. या पराभवामुळे विंडीजच्या वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये पाच सामन्यांत केवळ एक विजय मिळवणाऱ्या विंडीज संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विजय मिळवणं गरजेचं होतं.

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण विंडजने दिलं. केन विल्यमसन १४८ धावा आणि रॉस टेलर ६९ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंडने दिलेल्या २९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. शाय होप आणि निकोलस पूरन सुरूवातीलाच बाद झाले. पण, सलामीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने आक्रमक खेळी करत ८४ चेंडूत ८७ धावा केल्या, त्याला हेटमायरने चांगली साथ दिली आणि ५४ धावा केल्या. नंतर ख्रिस गेल आणि सिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रेथवेटने लढतीत रंगत आणली. ब्रेथवेटने ९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने ८२ चेंडूंमध्ये १०१ धावांची तुफानी खेळी केली. त्याने एका बाजूने खिंड लढवत शानदार शतकी खेळी केली आणि वेस्ट इंडिजला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. सात चेडूंमध्ये पाच धावांची आवश्यकता असताना त्याने विजयी षटकार मारण्याच्या प्रयत्न केला पण चेंडू ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडने पाच धावांनी विजय मिळवला.