News Flash

cricket World Cup 2019 : भारताचा विजयरथ वेस्ट इंडिज रोखणार?

पाच सामन्यांत चार विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे.

| June 27, 2019 04:15 am

उपांत्य फेरीच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण लढत

मँचेस्टर : भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याची करामत केली आहे. पाच सामन्यांत चार विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. गुरुवारी मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताचा विजयरथ रोखणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

वेस्ट इंडिजला सहा सामन्यांत फक्त एकच विजय मिळवता आला असून चार पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात कालरेस ब्रेथवेटने वेस्ट इंडिजला अनपेक्षित असा विजय मिळवून देण्याकडे कूच केली होती. मात्र षटकारांची आतषबाजी करणाऱ्या ब्रेथवेटची शतकी झुंज अखेर पाच धावांनी व्यर्थ ठरली होती. मैदानात चमकदार कामगिरी करूनही जेसन होल्डरच्या नेतृत्वाखालील विंडीज संघ थोडय़ा फरकाने अपयशी ठरत आहे. त्यातच यंदाची ‘आयपीएल’ गाजवणारा आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर फेकला गेला असून त्याची उणीव कॅरेबियन संघाला नक्कीच जाणवणार आहे.

दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांसारख्या बलाढय़ संघांचे आव्हान सहज परतवून लावल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विजयासाठी अक्षरश: झुंजावे लागले होते. महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवच्या संथ फलंदाजीवर सर्वानीच टीका केली होती. आता साखळीतील चार सामने शिल्लक राहिल्यामुळे धोनी आणि केदारला फलंदाजीत अधिक संधी देणे योग्य ठरेल. शिखर धवनच्या माघारीनंतर ऋषभ पंत संघात दाखल झाला आहे, मात्र त्याला संधी द्यायची की नाही, याचा निर्णय कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना घ्यावा लागणार आहे.

भारताची भक्कम गोलंदाजी

सामना जिंकून देण्याची क्षमता आपल्या गोलंदाजांमध्ये आहे, हे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दाखवून दिले. साऊदम्पटन येथे हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या मोहम्मद शमीचे संघातील स्थान पक्के मानले जात आहे. मांडीच्या दुखापतीतून भुवनेश्वर कुमार सावरत असला तरी त्याला खेळवण्याचा धोका भारतीय संघ व्यवस्थापन उचलणार नाही.

मधल्या फळीत स्थिरतेची गरज

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला ८ बाद २२४ धावा उभारता आल्या होत्या. रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या डावाला उभारी दिली होती. मात्र धोनी आणि केदार यांच्या संथ फलंदाजीमुळे भारताला मोठी धावसंख्या रचता आली नाही. पहिल्या दोन सामन्यांत लोकेश राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता, पण धवनच्या माघारीमुळे त्याला सलामीला उतरण्याची संधी मिळाली. चौथ्या क्रमांकावर संधी मिळूनही विजय शंकरला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे मधल्या फळीत स्थिरता आणण्याची गरज आहे.

रोहित, कोहलीवर फलंदाजीची जबाबदारी

सलामीवीर रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध अपयशी ठरला तरी त्याआधीच्या तीन सामन्यांत त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात योगदान दिले आहे. रोहितच्या नावावर यंदाच्या विश्वचषकात ३२० धावा जमा आहेत. त्यामुळेच वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना रोहितला मैदानावर उभे राहावे लागणार आहे. कर्णधार विराट कोहलीला यंदाच्या विश्वचषकात शतकी खेळी साकारता आली नसली तरी त्याने गेल्या तिन्ही सामन्यांत अर्धशतक फटकावत २४४ धावा आपल्या नावावर केल्या आहेत. त्यामुळे धवनच्या अनुपस्थितीत या दोघांना मोठी खेळी करावी लागणार आहे.

सामना क्र. ३४

भारत वि. वेस्ट इंडिज

स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम, मँचेस्टर   ’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, इव्हिन लेविस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टिरक्षक), सुनील अ‍ॅम्ब्रिज, कालरेस ब्रॅथवेट, फॅबिअन अ‍ॅलन, अ‍ॅश्ले नर्स, श्ॉनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : १२६,  भारत : ५९,

वेस्ट इंडिज : ६२, टाय / रद्द : २/३

विश्वचषकात   

सामने : ८, भारत : ५,

वेस्ट इंडिज : ३, टाय / रद्द : ०

खेळपट्टीचा अंदाज

पावसाची सुतराम शक्यता नसल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण खेळाचा आनंद लुटता येणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आतापर्यंत भक्कम फलंदाजी असणाऱ्या संघांचा बोलबाला राहिला आहे. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असल्यामुळे नाणेफेकजिंकून प्रथम फलंदाजी करण्यावर भर राहील.

विंडीजची भिस्त वेगवान गोलंदाजांवर

पाकिस्तानविरुद्धचा सलामीचा सामना जिंकत विंडीजने थाटात सुरुवात केली होती. पण नंतर त्यांची गाडी रुळावरून घसरत गेली. वेस्ट इंडिजच्या यशात आतापर्यंत वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल आणि ओशाने थॉमस यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. आपल्या धारदार आणि उसळत्या चेंडूवर त्यांनी जगातील अव्वल फलंदाजांना हादरवले आहे. प्रत्येक सामन्यात बळी मिळवून त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. त्यांना जेसन होल्डर, कालरेस ब्रेथवेट यांचीही चांगली साथ लाभत आहे.

ब्रेथवेट, हेटमायर बहरात

न्यूझीलंडविरुद्ध कालरेस ब्रेथवेटने संस्मरणीय अशी खेळी केली होती. खालच्या क्रमांकावरील ब्रेथवेट बहरात आल्यामुळे विंडीजची फलंदाजी अधिक भक्कम बनली आहे. त्याचबरोबर शाय होप आणि शिमरॉन हेटमायर हे फलंदाजीत योगदान देत आहेत. मात्र धोकादायक ख्रिस गेलला आपल्या लौकिकाला साजेशी अशी खेळी करता आली नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात गेलवादळ घोंघावेल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.

सचिनची पसंती भुवनेश्वरलाच

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने हॅट्ट्रिकची नोंद केली असली तरी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मात्र शमीऐवजी भुवनेश्वर कुमारलाच पसंती दर्शवली आहे. ‘‘भुवनेश्वर पूर्णपणे तंदुरुस्त झाला ही चांगली बाब म्हणावी लागेल. ख्रिस गेलसारख्या धोकादायक फलंदाजाचा अडसर दूर करण्याची क्षमता असल्यामुळेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरची निवड करण्यात यावी,’’ असे सचिनने सांगितले.

७ विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध तब्बल सात शतके झळकावली असून कॅरेबियन्स संघाविरुद्ध सर्वाधिक शतके नोंदवणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

८ ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडिजला १९८८ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही. विंडीजला गेल्या ८ सामन्यांत ७ वेळा पराभवाचा सामना करावा लागला असून एक सामना रद्द झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:15 am

Web Title: cricket world cup 2019 west indies vs india 34th match preview zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019 : अर्ध्यावरती डाव मोडला..
2 cricket world cup 2019 फ्री हिट : विश्वविजेतेपद माहीसाठी जिंकायचंय!
3 cricket world cup 2019 : ..तरीही विश्वचषक आम्हीच जिंकू!
Just Now!
X