मँचेस्टर : तीन पराभव आणि एक अनिकाली सामन्यामुळे आता वेस्ट इंडिजला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. शनिवारी विंडीजपुढे बलाढय़ न्यूझीलंडचे आव्हान समोर आहे.

वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव करीत विश्वचषक अभियानाला शानदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर विंडीजची कामगिरी ढासळत गेली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेश यांच्याकडून त्यांनी पराभव पत्करला. यापैकी मागील सामन्यात विंडीजने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३२१ अशी धावसंख्या उभारली. परंतु बांगलादेशने ४१.३ षटकांत सात गडी राखून विजय मिळवला.

विश्वचषक गुणतालिकेत विंडीजचा संघ ३ गुणांसह सातव्या स्थानावर आहे, न्यूझीलंडचा संघ ९ गुणांसह अव्वल चौघांमध्ये विराजमान आहे. किवी संघाने पाच सामन्यांपैकी चार विजय मिळवले आहेत, तर भारताविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला.

न्यूझीलंडची मदार विल्यम्सनवर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार केन विल्यम्सनने नाबाद १०६ धावांची विजयवीराची खेळी साकारून न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकापर्यंत रंगत टिकवणाऱ्या या सामन्यात विल्यम्सन मैदानावर असणे, न्यूझीलंडसाठी फायद्याचे ठरले. कॉलिन डी ग्रँडहोमनेही विजयात महत्त्वाची भूमिका बजावताना ४७ चेंडूंत ६० धावा केल्या. मात्र मार्टिन गप्टिल, कॉलिन मुन्रो, रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्याकडून न्यूझीलंडला मोठय़ा योगदानाची अपेक्षा आहे.

गेल-रसेलकडून विंडीजला अपेक्षा

विंडीजच्या फलंदाजीची धुरा इव्हिन लेविस, शाय होप, शिमरॉन हेटमायर आणि जेसन होल्डर यांच्यावर आहे. परंतु इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गाजवणाऱ्या ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांना अपेक्षांची पूर्तता करता आलेली नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांची कामगिरीसुद्धा खराब झाली. शेल्डर कॉट्रेल, शेनॉन गॅब्रिएल आणि ओशाने थॉमस यांनी टिच्चून मारा करण्याची आवश्यकता आहे.

सामना क्र. २९

वेस्ट इंडिज वि. न्यूझीलंड

* स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर  ’सामन्याची वेळ : सायं. ६ वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३

संघ

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, मार्टिन गप्तिल, कॉलिन मन्रो, टॉम लॅथम (यष्टिरक्षक), कॉलिन डी’ग्रँडहोम, जेम्स निशाम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मिचेल सँटनर, इश सोधी, टॉम ब्लंडेल, लॉकी फग्र्युसन, हेन्री निकोल्स.

वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, इव्हिन लेविस, शाय होप, डॅरेन ब्राव्हो, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कालरेस ब्रॅथवेट, फॅबिअन अ‍ॅलन, अ‍ॅश्ले नर्स, श्ॉनन गॅब्रिएल, शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस, केमार रोच.

आमनेसामने

एकदिवसीय    

सामने : ६४,  न्यूझीलंड : २७,

वेस्ट इंडिज : ३०, टाय / रद्द : ७

विश्वचषकात   

सामने : ७,  न्यूझीलंड :४,

वेस्ट इंडिज : ३, टाय / रद्द : ०