मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर १६ नोव्हेंबर २०१३ ला निवृत्त झाला. विंडीजविरुद्धच्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याने क्रिकेटला अलविदा म्हटले. पण क्रिकेटचा हा देव २००७ मध्येच निवृत्त होणार होता, असे जर तुम्हाला सांगितले तर …. पण हे अगदी खरं आहे! हा धक्कादायक खुलासा खुद्द सचिनने एका कार्यक्रमात केला. २००७ मध्ये सचिनचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला होता. त्यामुळे त्याने निवृत्ती स्वीकारण्याचा विचार केला होता, पण एका फोनमुळे सचिनने हा विचार बदलला.

सचिन म्हणाला की त्यावेळी भारतीय क्रिकेटसाठी एक वाईट काळ होता. विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ सुरुवातीच्या फेरीतच बाहेर फेकला गेला होता. भारतीय क्रिकेटशी संबंधित ज्या काही घटना त्यावेळी घडल्या, त्या घटना खूप वेदनादायी होत्या. त्यावेळी संघ बांधणीमध्ये बदल गरजेचा होता. तो बदल आला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती. क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचार मी ९०% पक्का केला होता. पण त्यावेळी विंडीजचे महान खेळाडू व्हिव्ह रिचर्ड्स यांनी मला फोन केला आणि समजावले. त्यामुळे मी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला नाही, असे सचिनने सांगितले.

सचिन आणि व्हिव्ह रिचर्ड्स

 

“२००७ साली अजीतने (सचिनचे बंधू) मला २०११ च्या विश्वचषक विजेतेपदाची स्वप्न दाखवले. ती सुंदर ट्रॉफी तुला जिंकायची आहे की नाही..? असा प्रश्न त्याने विचारला. त्यानंतर मी माझ्या फार्म हाऊसवर गेलो. तेथे मला व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा फोन आला. माझ्यात अजून पुष्कळ प्रतिभा शिल्लक आहे. मी चांगली कामगिरी करू शकतो, असे त्यांनी मला सांगितले. जेव्हा तुमचा हिरो तुम्हाला फोन करून तुमचे मनोधैर्य वाढवतो, तेव्हा ते खूपच खास वाटते. त्या ४५ मिनिटांच्या फोननंतर मी निवृत्तीचा निर्णय रद्द केला”, असे सचिनने स्पष्ट केले.