इंग्लंडमध्ये सध्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. प्रत्येक संघ आपल्या स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरतो आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. स्पर्धेत आफ्रिकेच्या संघाला २ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून विजय मिळवण्याच्या उद्देशाने त्यांचा संघ खेळेल, यात वाद नाही. पण विंडीजचे महान खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी कर्णधार कोहलीची केलेली स्तुती ही टीम इंडियाला प्रेरणादायी ठरणार आहे, असे म्हटले जात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली हा आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. त्याच्याएवढा आत्मविश्वास इतर कोणाच्यातही नाही, असे मत रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे.

“मला विराट कोहलीसारखे खेळाडू खूप आवडतात. लोक त्याच्या उद्धटपणाबाबत त्याच्यावर टीका करतात. पण मला असे वाटते की तो त्याचा आत्मविश्वास आहे. त्याचा मैदानावरील वावर अतिशय विश्वासपूर्ण असतो. एखाद्याकडे आपल्या घराच्या चाव्या असतात, तेव्हा तो जेवढ्या आत्मविश्वासाने जाईल त्या आविर्भावात विराट मैदानावर खेळतो. मी माझ्या काळात ज्या प्रकारे मैदानावर खेळायचो आणि वावरायचो त्या पद्धतीने तो हल्ली खेळ खेळतो. कारण तो आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे.” अशा शब्दात व्हिव्ह रिचर्ड्स यांनी विराटचे कौतुक केले.

विराट कोहली

“भारतीय फलदांजी मला कायमच आवडली आहे. विराट कोहलीकडे ज्या पद्धतीचा आत्मविश्वास आहे, त्या पद्धतीचा आत्मविश्वास एका रात्रीत येत नाही. त्याच्याइतका आत्मविश्वास कोणत्याही इतर खेळाडूंमध्ये मला दिसत नाही. असा आत्मविश्वास तुमच्यात जन्मतःच असावा लागतो. तो लढाऊ आहे. तो उद्धटपणे खेळत नाही. तो उत्तम पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देतो. मोठ्या स्पर्धेत खेळताना जे गुण खेळाडूंकडे असावेत असे वाटते, ते गुण कोहलीकडे आहात. म्हणूनच तो सर्वोत्तम खेळाडू आहे.”, असेही रिचर्ड्स म्हणाले.