21 September 2020

News Flash

‘टीम इंडिया’ला विश्वचषकाची आस

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या या १५ खेळाडूंच्या क्षमतांचा आढावा.

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या या १५ खेळाडूंच्या क्षमतांचा आढावा.

जगभरातील क्रिकेटप्रेमी ज्या गोष्टीची चार वष्रे आतुरतेने वाट पाहत असतात तो क्रिकेटचा विश्वचषक आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. एव्हाना जवळपास सर्व संघांनी विश्वचषकासाठी आपापले १५ सर्वोत्तम खेळाडू निवडले आहेत. एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीनेदेखील नुकतीच भारतीय संघाची घोषणा केली.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु सुमार कामगिरी करत असला तरी विश्वचषकासाठी भारताचे नेतृत्व त्याच्याकडेच राहणार, हे निश्चित होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात सलामीसाठी फार पर्याय नव्हतेच. रोहित शर्मा व शिखर धवन यांच्या अनुभवी सलामी जोडीने २०१३च्या चॅम्पियन्स करंडकापासून भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे विश्वचषकातही पुन्हा एकदा त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. क्वचितच या दोघांपकी कोणी एक जखमी झाल्यास लोकेश राहुलला सलामीची संधी मिळू शकते. तिसऱ्या क्रमांकावर कोहलीसारखा आधारस्तंभ असल्यामुळे भारताची मदार प्रामुख्याने आघाडीच्या तीन फलंदाजांवरच असेल, यात शंका नाही.

जवळपास गेले एक वर्ष भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण, याचा शोध घेत आहेत. सुरेश रैना, अंबाती रायुडू, लोकेश राहुल, ऋषभ पंत आणि हार्दकि पंडय़ा यांसारखे नानाविध पर्याय वापरूनही भारताच्या पाठी लागलेला चौथ्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मात्र आता विजय शंकरकडेच चौथ्या स्थानासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. अंबाती रायुडू न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे शंकरची निवड योग्य आहे. अल्पावधीतच त्याने मर्यादित क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. चौथ्या क्रमांकावर संधी नाहीच मिळाली तरी शंकर सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावरदेखील उपयुक्त योगदान देऊ शकतो. त्याशिवाय काही क्रिकेटपंडितांनी कोहलीला चौथ्या क्रमांकावर पाठवून भारताने राहुल किवा अन्य खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी द्यावी, असेही सुचवले असल्याने विश्वचषक सुरू झाल्यानंतरच प्रत्यक्षात भारत कोणता पर्याय अजमावतो, हे समजेल.

९१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या दिनेश काíतकला संघात स्थान दिल्यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी मोक्याच्या क्षणी काíतक संयमी फलंदाजी करू शकतो, त्यामुळेच युवा पंतच्या ऐवजी त्याला पसंती देण्यात आली. तसेच स्पध्रेदरम्यान धोनीला दुखापत झाल्यास संघाला अनुभवी यष्टीरक्षकाची गरज भासू शकते, त्या वेळी काíतकच भारताचा तारणहार ठरू शकतो. पंत संयमी फलंदाजी करण्यात कमकुवत असून त्याच्या यष्टीरक्षणात अनेक त्रुटी असल्यानेच त्याला डावलले असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले होते.

पाचव्या व सहाव्या क्रमांकासाठी धोनी व केदार जाधव यांनी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. धोनीचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वानाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा आहे. त्याशिवाय धोनी व केदार यांच्या जोडीने गेल्या काही सामन्यांत कठीण परिस्थितीतून भारताला विजय मिळवून दिला असल्याने भारताची मधली फळीही उत्तमरीत्या जुळून आली आहे. अष्टपलू हार्दकि पंडय़ा सातव्या स्थानावर येऊन अखेरच्या षटकांत उपयुक्त फटकेबाजी करू शकतो. त्यामुळे या तिघांचेही अंतिम ११मधील स्थान निश्चित आहे. पंडय़ा किमान पाच-सहा षटके गोलंदाजीदेखील टाकू शकतो, त्यामुळे संघ व्यवस्थापनाने चौथा वेगवान गोलंदाज खेळवण्याऐवजी पंडय़ाव्यतिरिक्त अष्टपलू शंकरला संघात स्थान दिले.

गत विश्वचषकाच्या तुलनेत यंदा भारताची गोलंदाजांची फळी अधिक धारदार व सक्षम वाटते. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार हे वेगवान त्रिकूट, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल या फिरकीपटूंची जोडी व रवींद्र जडेजाचा पर्याय यामुळे भारताला चिंता करण्याचे कारण नाही. मुख्य म्हणजे बुमरा मागील काही वर्षांत विश्वातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला असून फलंदाजीत ज्याप्रमाणे कोहली तसेच गोलंदाजीत त्याच्यावरच भारताची भिस्त राहणार आहे. तसेच नवदीप सनी, खलिल अहमद, दीपक चहर व आवेश खान हेदेखील पर्यायी गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत जाणार आहेत.

एकूणच निवड समितीने सावध पवित्रा स्वीकारत विश्वचषकासाठी भारताचे सर्वोत्तम १५ खेळाडू निवडले असून हे शिलेदार भारताला तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकवून देण्याची किमया साधणार का, हे पाहणे रंजक ठरेल. विश्वचषकात भारताची पाच जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी सलामीची लढत रंगणार आहे.

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अजिंक्य रहाणेसारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला चौथ्या क्रमांकावर संधी मिळायला हवी होती, असे मला वाटते. त्याशिवाय पंतला वगळल्यामुळेदेखील मी काहीसा आश्चर्यचकित झालो आहे. मात्र शेवटी विश्वचषकासाठी अनुभव महत्त्वाचा असल्यामुळेच काíतकची निवड योग्य आहे. त्याशिवाय कोहली हा एक आक्रमक व सकारात्मक कर्णधार आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत त्याचे खांदे खाली झुकलेले नसतात. विश्वचषकात भारताची त्याच्यावरच सर्वाधिक मदार असेल, हे आपण लक्षात ठेवायला हवे. भारताची वेगवान गोलंदाजांची फळी सक्षम असून त्यांना कुलदीप व चहल या मनगटी फिरकी जोडीची उत्तम साथ लाभल्यास भारताला रोखणे कठीण जाईल. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड या संघांकडून आपल्याला कडवे आव्हान मिळू शकते.

– चंद्रकांत पंडित, माजी क्रिकेटपटू व प्रशिक्षक.

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ नक्कीच समतोल व परिपूर्ण आहे. कोहली हा एक अतिशय हुशार व अव्वल दर्जाचा फलंदाज आहे, यामध्ये काहीही शंका नाही. परंतु कर्णधार म्हणून त्याला नक्कीच सुधारणेला वाव आहे. मात्र विश्वचषकात धोनी त्याच्या सहकार्यासाठी असेल,  त्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. पंतला अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असून धोनीनंतर त्यालाच तिन्ही प्रकारांत भारताच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडायची आहे. त्यामुळे त्याने आगामी आव्हानांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विश्वचषकातील कामगिरीनंतर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर यांसारख्या युवा खेळाडूंना संघ व्यवस्थापन संधी देऊ शकते. माझ्या मते चौथ्या क्रमांकावर कोहली खेळल्यास संघाला मधल्या षटकांत स्थर्य प्राप्त होईल. त्यामुळे तिसऱ्या स्थानावर राहुल किंवा शंकर यांना संधी देण्यास काहीही हरकत नाही. परंतु हीसुद्धा एक जोखीम असल्यामुळे संघ व्यवस्थापन कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरच कायम ठेवण्याची शक्यता आहे. जसप्रीत बुमरा व विजय शंकर यांच्या कामगिरीवर माझी प्रामुख्याने नजर आहे.  तसेच स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला असून त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे.

– अबेय कुरुव्हिला, माजी क्रिकेटपटू.

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 1:01 am

Web Title: cricket world cup 30th may 2019 in england team india
Next Stories
1 IPL 2019 : दिनेश कार्तिकचं शतक हुकलं, कोलकात्याकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद
2 अजिंक्य रहाणेचं काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय
3 घरच्या मैदानावर कोलकात्याच्या पदरी पराभव, राजस्थान ३ गडी राखून विजयी
Just Now!
X