विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध १८ धावांनी पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या ७७ धावांच्या खेळीमुळे भारताला लाजिरवाणा पराभव टाळता आला. धोनी आणि जाडेजाची जोडी मैदानात असेपर्यंत भारतीय चाहत्यांच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र जडेजा ७७ धावांवर झेलबाद झाला आणि त्यानंतर धोनी ५० धावांवर धावबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले. या पराभवाबरोबर विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंग पावलं. जिकरीची खेळी करुन भारताला विजय मिळून देण्यात अपयशी ठरलेला जाडेजा या पराभवामुळे पूर्णपणे खचू गेला होता. सामन्यात पराभव झाल्यानंतर तो बराच काळ रडत होता अशी माहिती त्याची पत्नी रिवाबा सोलंकी हिने दिली आहे.

जाडेजा मैदानात आला त्यावेळी भारताचे सहा गडी तंबूत परतले होते. धोनीची सोबत करायला जाडेजा सातव्या क्रमांकावर मैदानात उतरला तेव्हा भारतीय संघाची स्थिती ६ बाद ९२ अशी होती. जाडेजाने धोनीच्या सोबतीने सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागिदारी केली. मात्र विजयापासून ३१ धावांवर असताना जाडेजा बाद झाला. ५९ चेंडूमध्ये ७७ धावा करणाऱ्या जाडेजाच्या खेळीमुळे भारताच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र जलद गतीने धावा करण्याच्या नादात मोठा फटका मारताना तो बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. जाडेजा बाद झाला तेव्हा भारताला १३ चेंडूंमध्ये ३१ धावांची गरज होती. मात्र जाडेजा बाद झाल्यानंतर चार चेंडूंनंतर धोनीही दोन धावा घेण्याच्या नादात धावबाद झाला आणि भारताच्या उरल्या सुरल्या आशाही मावळल्या.

पराभवानंतर जाडेजा नक्की काय म्हणाला याबद्दल त्याची पत्नी रिवाबाने बॉम्बे टाइम्सशी बोलताना सांगितले. ‘पराभवानंतर त्याचं रडणं थांबतच नव्हतं. तो रडता रडताच सतत ‘मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य बडबडत होता,’ असं रिबावाने सांगितले. तसेच या पराभवामधून सावरण्यासाठी जाडेजाला वेळ लागेल असंही रिवाबाने म्हटले. ‘विजयाच्या एवढ्या जवळ येऊन पराभव झाल्यास अशा पराभवाचा खूप त्रास होतो. यामधून सावरण्यासाठी वेळ लागेल,’ असं मत रिवाबाने व्यक्त केलं आहे. या पराभवानंतर जाडेजाने ट्विटवरुन पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले होते.

जाडेजाला अगदीच मोजक्या सामन्यामध्ये संधी मिळूनही त्यांची चांगली खेळी केली. उपांत्य सामन्यातही त्याच्याच खेळीमुळे भारताने दमदार कमबॅक केले होते. या खेळीबद्दल बोलताना रिवाबा म्हणाली, ‘त्याच्या उपांत्य सामन्यातील कामगिरीबद्दल माला आश्चर्य वाटले नाही. तो अनेकदा महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याच्या कारकिर्दीमधील आकडेवारी पाहिली तर मोठ्या सामन्यांमध्ये तो चांगला खेळ करतो हेच दिसून येते. त्याने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्येही कमाल केली.’ जाडेजाने या आधीही गरज असताना चांगला खेळ करुन भारताला विजय मिळवून दिल्याची आठवण त्याच्या पत्नीने करुन दिली. ‘२०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याने अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळी करत भारताला विजय मिळून दिला होता. अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला होता,’ असं रिवाबा म्हणाली.