हरहुन्नरी फलंदाज हिकेन शाहला भ्रष्टाचारप्रकरणी निलंबित केल्याच्या घटनेमुळे मुंबईच्या क्रिकेटवर्तुळाला धक्का बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी म्हणाले की, ‘‘माझ्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. हिकेन या घटनेत सहभागी आहे, यावर विश्वास ठेवणे अजूनही जड जात आहे.’’
हिकेनचे मुंबई क्रिकेटमधील वागणे संशयास्पद जाणवत होते का, या प्रश्नाला उत्तर देताना शेट्टी म्हणाले की, ‘‘कधीच नाही. एक चांगला, प्रामाणिक आणि तरुण खेळाडू म्हणून मी त्याला ओळखायचो. बीसीसीआयचा या प्रकरणी तपास पूर्ण झाला नसल्याने मी प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही.’’
मुंबईतील माजी रणजीपटूने सांगितले की, ‘‘अंकित चव्हाण जेव्हा स्पॉट-फिक्सिंगमध्ये दोषी सापडला होता. त्या वेळीही अंकितसारखा मुलगा हे असे करू शकतो का, यावर विश्वास बसला नव्हता. हिकेनची घटना, हा माझ्यासाठी आणखी एक धक्का आहे.’’
‘‘हिकेन हा गुजराती मुलगा संयमी डावखुरी फलंदाजी करायचा. मुंबईचा ‘खडूस’पणा त्याच्या नसानसांत भिनला होता. त्याच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव होता. त्याचे संघातील स्थान निश्चित नव्हते,’’ असे या क्रिकेटपटूने पुढे सांगितले.
हिकेन मुंबई कस्टम्समध्ये सरकारी नोकरीत होता. टाइम्स शिल्डमध्येही तो या संघाचे प्रतिनिधित्व करायचा, तर कांगा लीगमध्ये पी. व्ही. शेट्टी यांच्या मालकीच्या पय्याडे क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करायचा.